कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:12 PM2023-07-10T13:12:50+5:302023-07-10T13:13:26+5:30
नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली
काेल्हापूर : जिल्ह्यातील काळम्मावाडी धरण वगळता बहुतांशी धरणात ३५ टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटावर गेल्याने नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
यंदा जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे पाऊस कधी सुरु होणार आणि धरणात पाणी साठणार कधी? याची चिंता सगळ्यांनाच लागली होती. गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे हळूहळू धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बहुतांशी धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काळम्मावाडी धरणात आतापर्यंत १४ टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात सतत पाऊस आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ७०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला काहीसी फुग आली आहे.
पंचगंगेची पातळी वाढत असून रविवारी ती २१ फुटापर्यंत पोहचली होती. नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रोप लागणीला अपेक्षित असाच पाऊस होत असल्याने ज्या शेतकऱ्यांचा तरवा तयार आहे, त्यांची रोप लागणीसाठी धांदल उडाली आहे.
कोदे ९३ टक्के भरले
जिल्ह्यात सर्वप्रथम चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण ९३ टक्के भरले असून येत्या दोन दिवसात तेही पूर्ण क्षमतेने भरू शकते.