कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाचा जोर; ‘राधानगरी’ ५०, तर ‘कुंभी’ ५३ टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:37 PM2023-07-17T13:37:54+5:302023-07-17T13:38:44+5:30
जिल्ह्यात मात्र उघडझाप
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे. राधानगरी धरण ५० टक्के, तर कुंभी ५३ टक्के भरले आहे. जिल्ह्यात मात्र, पावसाची उघडझाप सुरू आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या.
तीन-चार दिवस उघडीप दिल्यानंतर शनिवारपासून जिल्ह्यात पावसाची भुरभुर सुरू आहे. रविवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मात्र, पावसाला जोर लागत नाही. गगनबावडा व भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस आहे. धरण क्षेत्रात पाऊस चांगला सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जुलै निम्मा झाला तरी प्रमुख धरणे निम्मीही भरली नसल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, रविवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ‘राधानगरी’ धरण निम्मे भरले आहे. जांबरे धरण ७२ टक्के भरले असून वारणा, कासारी, कडवी ही धरणे ४४ टक्क्यांपर्यंत आहेत.
रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ११ मिलीमीटर पाऊस झाला. पंचगंगेची पातळी १५.२ फुटापर्यंत आहे. शिंगणापूर, रुई, इचलकरंजी हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत.
धुवादार कधी?
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान विभागाचा आहे. सगळ्यांनाच धुवादार पावसाची प्रतीक्षा आहे.
कोल्हापूरकरांचे लक्ष काळम्मावाडीकडे
कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडीतून नवीन थेट पाइपलाइन याेजना पूर्ण होत आहे. त्यामुळे हे धरण कधी भरणार, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
अशी भरलीत धरणे, पाऊस मिलीमीटर
धरण - टक्केवारी - सध्याचा पाऊस - गेल्यावर्षीचा पाऊस
राधानगरी - ५० - १०९९ - १८०९
तुळशी - २९ - ६३१ - १७६०
वारणा - ४४ - ३७० - ११४९
दूधगंगा - २० - ७०५ - १३३८
कासारी - ४४ - १२०२ - १८८१
कडवी - ४५ - ८८० - १५९४
कुंभी - ५३ - १५९२ - २५०७
पाटगाव - ३९ - २०४९ - ३००८
चिकोत्रा - ३० - ४५४ - १०६५
चित्री - २४ - ५६१ - १२१८
जंगमहट्टी - ३० - ३८८ - १०८४
घटप्रभा - १०० - १५९६ - २५८९
जांबरे - ७२ - ९१३ - १४९६
आंबेओहोळ - ३३ - ३१० - ८९०
कोदे - १०० - १५९७ - २८३३