कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:22 PM2024-07-08T12:22:57+5:302024-07-08T12:24:16+5:30

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water | कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. दिवसभर एकसारखा पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणीचपाणी झाले आहे. शहरात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३२.०९ फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ५७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

जिल्ह्यात काल, रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत ११ वाजेपासून एकसारखा पाऊस सुरू होता. दिवसभर संततधार कोसळत असून, कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

राधानगरी धरण ४२ टक्के भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १३०० तर वारणा धरणातून ६७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर फेकले असून, आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे. विविध नद्यांवरील ५७ बंधारे पाण्याखाली गेले असून, दोन राज्य मार्ग व चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे. पंचगंगेची ३९ फूट पातळी ही इशारा पातळी म्हणून ओळखली जाते.

काल, रविवारी दिवसभरात १५ बंधारे पाण्याखाली

रविवारी सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पातळी २८ फुटांपर्यंत होती, दिवसभरात दोन फुटांची वाढ होत असतानाच तब्बल १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोदे धरण भरले...

जिल्ह्यात आतापर्यंत चंदगड तालुक्यातील घटप्रभा, जांबरे धरणे भरली आहेत. रविवारी सकाळी गगनबावडा तालुक्यातील कोदे हा लघू पाटबंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यातून प्रतिसेकंद ४०० घनफुटाचा विसर्ग सुरू आहे.

१२ मालमत्तांची पडझड

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६ लाख २८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

५७ बंधारे पाण्याखाली 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे व करंजफेण, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी,  हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडूकली व सांगशी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे 

राधानगरी ३.८७ टीएमसी, तुळशी १.७१ टीएमसी, वारणा १६.६६ टीएमसी, दूधगंगा ८.३३ टीएमसी, कासारी १.२५ टीएमसी, कडवी १.६७ टीएमसी, कुंभी १.१४ टीएमसी, पाटगाव २.३२ टीएमसी, चिकोत्रा ०.५२ टीएमसी, चित्री १.०१ टीएमसी, जंगमहट्टी ०.९३ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, आंबेआहोळ १.०० टीएमसी, सर्फनाला ०.२५ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. 

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम ३२.२ फूट, सुर्वे ३०.६ फूट, रुई ६० फूट, इचलकरंजी ५६ फूट, तेरवाड ४८ फूट, शिरोळ ३९ फूट, नृसिंहवाडी ३७ फूट, राजापूर २६.६ फूट तर नजीकच्या सांगली  ११.६ फूट व अंकली १५.४ फूट अशी आहे.

Web Title: Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.