कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:40 AM2024-05-14T11:40:06+5:302024-05-14T11:40:22+5:30
कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकाव ...
कोल्हापूर: सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकाव झाला.
कोडोली परिसराला सोमवारी रात्री जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभर कडाक्याचे ऊन होते तर साडेपाचपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला यावेळी विजेच्या कडकडाट होताच मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या वरुणराजाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
गडहिंग्लज शहरासह परिसरात पाऊस
गडहिंग्लज : वळीव पावसाने गडहिंग्लज शहरासह नेसरी, महागाव, हलकर्णी, नूल आणि कडगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दिवसभरातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. परंतु, पावसामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. भाजीपाला, ऊस आणि उन्हाळी पिकांसह शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे.
राधानगरी परिसरात पावसाची हजेरी
राधानगरी : परिसरात सोमवारी रात्री ८:३० च्या दरम्यान वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला. सोमवार सायंकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. राधानगरी धरण परिसर शिरोली, तारळे, पिरळ, फेजिवडेसह तालुक्यातील अनेक गावांत पाऊस झाला.
वाघापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस
वाघापूर : वाघापूर तसेच परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. आज दुपारपासून उष्मा वाढल्याने पावसाचे आगमन झाले. सोसाट्याच्या वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने काही घरांची कौले उडून गेली, तर काही झाडे घरावर पडून नुकसान झाले आहे. ऊस पिकासाठी पाऊस समाधानकारक झाला असला तरी भुईमूग, तीळ काढणीची कामे थांबली आहेत. कडाक्याची वीज, पाऊस यामुळे सतत विजेचा लपंडाव सुरू आहे.
किणीसह परिसरात पाऊस
किणी : किणीसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेले काही दिवस वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असताना सोमवारी सायंकाळी ७ वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.