कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; कासारी नदी पात्राबाहेर, बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:45 PM2023-07-19T12:45:20+5:302023-07-19T13:34:36+5:30
जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर /अणुस्कुरा : कोल्हापूर जिल्ह्यात काल, मंगळवार पासून पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. गेळवडे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कासारी नदी पात्रा बाहेर पडली आहे. यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. लहान लहान ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. कासारी नदीवर असणारा बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने बर्की, बुरानवाडी, बरकी धनगरवाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. बर्की पुलावरून धोकादायकपणे पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत म्हणून शाहूवाडी पोलीस स्टेशनकडून सकाळपासूनच बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सात बंधारे पाण्याखाली
गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर तुलनेत अधिक आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाचा जोर अधिक राहिला. सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. दुपारच्या वेळेत काही काळ पावसाने विश्रांती घेतली असली तरी सायंकाळी चारनंतर पुन्हा जोर धरला. कोल्हापूर शहरातही दिवसभर रिपरिप सुरुच होती.
राधानगरी धरणात ४.५५ टीएमसी पाणीसाठा
धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणात ४.५५ टीएमसी पाणीसाठा असून, मंगळवारी रात्री वीजनिर्मितीसाठी प्रति सेकंद ७०० घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात वाढ झाली असून, १८ फुटांपर्यंत पातळी पोहोचली आहे.
२३ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे, वेदगंगा नदीवरील- निळपण व वाघापूर, कुंभी नदीवरील- कळे व शेनवडे, वारणा नदीवरील - चिंचोली व माणगांव असे एकूण 23 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी 30.91 दलघमी, वारणा 484.56 दलघमी, दूधगंगा 185.74 दलघमी, कासारी 39.81 दलघमी, कडवी 37.30 दलघमी, कुंभी 45.61 दलघमी, पाटगाव 49.65 दलघमी, चिकोत्रा 14.17 दलघमी, चित्री 16.44 दलघमी, जंगमहट्टी 11.58 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 21.60 दलघमी, आंबेआहोळ 11.85, कोदे (ल.पा) 6.06 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम 29.9 फूट, सुर्वे 21.2 फूट, रुई 49 फूट, इचलकरंजी 46.6, तेरवाड 41.6 फूट, शिरोळ 32.9 फूट, नृसिंहवाडी 24.9 फूट, राजापूर 16 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 7.5 फूट अशी आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 17 मिमी, शिरोळ - 15.8 मिमी, पन्हाळा- 44.7 मिमी, शाहूवाडी- 47.2 मिमी, राधानगरी- 47.8 मिमी, गगनबावडा-98.1 मिमी, करवीर- 34 मिमी, कागल- 35.3 मिमी, गडहिंग्लज- 35.3 मिमी, भुदरगड- 63.5 मिमी, आजरा- 64 मिमी, चंदगड- 73.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
वेदगंगेवरील चार बंधारे पाण्याखाली
पाटगाव व काळम्मावाडी धरण क्षेत्रात झालेल्या धुवाधार पावसामुळे कागल तालुक्यातील वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. या नदीवरील बस्तवडे-आणूर,मळगे-सुरूपली, कुरणी-मुरगूड,नानीबाई चिखली-कुर्ली दरम्यान असणारे कोल्हापूरी पद्धतीचे चारही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर बानगे-सोनगे दरम्यानच्या पुलासह दोन वर्षांपूर्वी १०कोटींचा निधी खर्च करून आणूर बस्तवडे दरम्यान मोठा पुल उभारण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील १०हून अधिक गावांना वाहतूकीसाठी वरदाई ठरला असून या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पडझड होऊन सुमारे ६० हजारांचे नुकसान
जिल्ह्यात दोन खासगी मालमत्तांची पडझड होऊन सुमारे ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.