कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली
By राजाराम लोंढे | Published: July 19, 2024 04:49 PM2024-07-19T16:49:36+5:302024-07-19T16:51:14+5:30
जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाचा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस सुरु असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पंचगंगा ३३ फुटावरुन वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्या जनजीवन काहीसे विस्कळीत गेले आहे.
जिल्ह्यातील चार धरणे पुर्ण क्षमतेने भरली असून प्रमुख ‘राधानगरी’ ६८, ‘वारणा’ ६६ तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळ पासून त्यात वाढ होत गेली असून दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढ्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.
धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद १४००, वारणातून १५४६,. कासारीतून ५५०, कुंभीतून ३००, घटप्रभातून ६९५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी झपाट्याने वाढ आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता ३३ फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (३९ फुट) आगेकुच करु लागली आहे. विविध नद्यांवरील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाने कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीच्या गावांना सावधनतेचा इशारा दिला आहे.
२२ खासगी मालमत्तांची पडझड
जिल्ह्यात २२ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.