शेतकऱ्यांना दिलासा! कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, रब्बी पेरण्यांना वेग येणार
By राजाराम लोंढे | Published: November 8, 2023 11:57 AM2023-11-08T11:57:51+5:302023-11-08T11:58:52+5:30
ऊस पिकांना जीवदान मिळाले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे. ओलीअभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. रविवार (दि.१२) पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम एक महिनाच पाऊस झाला. परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाले. जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता.
ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला. सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरू होणार आहेत.
सप्टेंबरपासूनच विद्युत पंप सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. गेली दोन महिने उभ्या उसाला पाणी द्यावे लागत आहे. त्यात आठ तासच वीज मिळते, मात्र पाण्याअभावी जमिनी भेगाळल्यामुळे पाणीच पुढे सरकत नाही. त्यामुळे पाण्याचा फेरच बसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. बुधवारी करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. हातकणंगले तालुक्याच्या काही भागातही चांगला पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना आता गती येणार आहे.
पूर्वेकडील तालुक्यात कमी पाऊस
जिल्ह्याच्या पूर्वेकडील काही तालुक्यांत तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वीट व्यावसायिकांची तारांबळ
अखंड ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही आणि कडक उन्हामुळे वीट व्यवसाय जोमात होता. मात्र, अवकाळी पावसाने त्यांची तारांबळ उडाली होती.
गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्या
जिल्ह्यात गुऱ्हाळ घरांनी वेग पकडला आहे. साखर कारखाने सुरू नसल्याने त्यांचा हंगाम जोरात आहे. अवकाळी पावसाने त्यांचीही तारांबळ उडाली असून जळण भिजल्याने गुऱ्हाळ घरांच्या चिमण्या धुमू लागल्या आहेत.