कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार; पंचगंगा धोक्याकडे, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:46 PM2024-07-24T13:46:17+5:302024-07-24T13:48:07+5:30

पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू : वाहतूक ठप्प

Heavy rain in Kolhapur district; The water level of Panchganga river is at risk, the automatic gates of Radhanagari will open at any moment | कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार; पंचगंगा धोक्याकडे, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होणार

कोल्हापूर जिल्ह्यात धुवाधार; पंचगंगा धोक्याकडे, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होणार

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने पुन्हा जाेर पकडला आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस कोसळत असल्याने, राधानगरी धरण ९२.८ टक्के भरले असून, या धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ३,८२० घनफूट विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची तुंबी वाढली आहे. पंचगंगा ४२.०३ फुटांवरून वाहत धोका पातळीकडे वाटचाल सुरू ठेवल्याने नदीकाठच्या गावांची चिंता वाढली आहे. तब्बल ८१ बंधारे व ४४ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू केले आहे.

सोमवारी पावसाने उसंत घेतली होती, पण मंगळवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ९२.८ टक्के भरले असून, साधारणता ९५ टक्के धरण भरल्यानंतर एक-एक स्वयंचलित दरवाजा खुला होतो.

सध्या धरणातून प्रति सेकंद १,५०० घनफूट विसर्ग सुरू असला, तरी ‘वारणा’मधून प्रतिसेकंद ३,८२० घनफूट पाणी सोडल्याने पंचगंगेच्या पुराची तीव्रता वाढू लागली आहे. पंचगंगेने हळूहळू धोक्याकडे वाटचाल सुरू केल्याने कोल्हापूरकरांची अस्वस्थता वाढू लागली आहे. ८१ बंधारे व ४४ मार्ग बंद राहिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

पडझडीत ४६.९६ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात एका सार्वजनिक मालमत्तेसह ११७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ४६ लाख ९६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

‘गोकुळ’चे संकलन १५ हजार लीटरने घटले

पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यात अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. ‘गोकुळ’ दूध संघाचे गेल्या चार दिवसांत दूध संकलन १५ हजार ५३९ लीटरने घटले आहे. यामध्ये १० हजार ८४६ लीटर म्हैशीचे आहे.

एसटीचे २० मार्ग बंद

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे २० मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.

असे आहेत मार्ग बंद..

  • राज्य मार्ग - ८
  • प्रमुख जिल्हा मार्ग - २६
  • इतर जिल्हा मार्ग - ७
  • ग्रामीण मार्ग - १६


स्थलांतरीत कुटुंबे..

  • महापालिका हद्दीतील : १०२
  • पन्हाळा तालुका : १६
  • हातकणंगले व करवीर तालुका : ३९


सध्याची पातळी : ४२.३ फूट
बंधारे पाण्याखाली : ८१
नुकसान : ११८ मालमत्ता
नुकसानीची रक्कम : ४६ लाख ९६ हजार

Web Title: Heavy rain in Kolhapur district; The water level of Panchganga river is at risk, the automatic gates of Radhanagari will open at any moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.