परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली
By राजाराम लोंढे | Published: September 27, 2023 07:08 PM2023-09-27T19:08:18+5:302023-09-27T19:09:18+5:30
मंगळवार (दि.३ ऑक्टोबर) पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज
कोल्हापूर : परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अक्षरश: झोडपून काढले. अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसाने शहरात सगळीकडे पाणीच पाणी करून सोडले. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कडगाव, शिरोळसह पाच सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
ऐन मान्सूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने तासभर झोडपून काढले. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शिवारात पाणी साचले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शिरोळ, कडगाव, आंबा, हलकर्णी, कसबा नूल या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी पावणेचार वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पावसाने सुरुवात केली. अर्धा-पाऊण तासात सगळीकडे पाणीच पाणी केले.
मंगळवार (दि. ३ ऑक्टोबर) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात रोज परतीचा पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. ओढे-नाले ओसंडून वाहत असून, असाच पाऊस आणखी दोन दिवस राहिला तर धरणातून विसर्गही वाढणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यताही आहे.