कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:31 PM2024-08-26T12:31:10+5:302024-08-26T12:32:07+5:30
ऑरेंज अलर्टचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत वाढ होवून ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी काही काळ उसंत घेतली, पण अकरापासून पुन्हा जोर पकडला. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरातही पाऊस असल्याने सगळीकडे पाणी झाले आहे. आठवडा सुट्टी, त्यात पाऊस असल्याने शहरातील अनेक रस्ते ओस पडल्यासारखे दिसत होते.
रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत झाला आहे. धरणक्षेत्रातही पाऊस अधिक असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे सुरुवातीला दोन आणि नंतर दोन, असे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ७२१२ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी आज, सोमवारी २८.०३ फूट होती. ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
चार धरणक्षेत्रांत धुवाधार..
घटप्रभा, पाटगाव, कोदे, कासारी या चार धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस कोसळला आहे. सरासरी ११० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस येथे झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पडझडीत ३.९० लाखांचे नुकसान
जिल्ह्यात २० खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ऑरेंज अलर्टचा इशारा
कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यासाठी आज, सोमवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दिवसभरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.