कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस
By Admin | Published: November 16, 2016 12:44 AM2016-11-16T00:44:37+5:302016-11-16T00:44:37+5:30
दोन तास झोडपले : नागरिकांची तारांबळ; तारा तुटल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने तब्बल दोन तास तळ ठोकल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भिजतच घरी जावे लागले. कळंबा, लक्ष्मीपुरी परिसरातील विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता.
यंदा मान्सून चांगलाच बरसल्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मुक्काम हलविला होता. त्यानंतर बोचऱ्या थंडीने एंट्री केली होती. गेल्या दोन दिवसात थंडीची तीव्रता काहीसी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकसारखा दोन-अडीच तास जोरदार पाऊस राहिल्याने नागरिकांना रस्त्यातच ताटकळतच थांबावे लागले. तर अनेकांना कार्यालयात थांबून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पाऊस थांबत नसल्याने अनेकांनी भिजतच घर गाठले. अचानक आलेल्या पावसाने फेरीवाले, रस्त्यावरील स्टॉलधारकांची पळापळ झाली. पाऊस जोरदार झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा गुऱ्हाळघरे, साखर कारखाने, वीट व्यावसायिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान वीटभट्ट्यांचे झाले आहे. भाताची सुगी संपली असली तरी नागलीच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यामध्येही अडथळा निर्माण झाला आहे.
कळंबा ते लक्ष्मीपुरी लाईनवरील वीजपुरवठा खंडित
संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे कळंबा लक्ष्मीपुरी वीजवाहिनीवरील तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता.
कळंबा कारागृहाजवळ झाडाची फांदी पडून तार तुटली तर अनेक ठिकाणी क्रॉस तुटले. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महालक्ष्मीनगर तेथुन पुढील भागातही अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करत तुटलेल्या तारा जोडत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एटीएमसमोर गर्दी
संध्याकाळी मोठ्या पावसाने एटीएमसमोरील गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास पाऊस पूर्ण बंद झाल्याने नागरिक पुन्हा एटीएमवर गर्दी करू लागले; परंतु अनेक एटीएमवरील पैसे संपल्याने ज्या मोजक्या एटीएममध्ये पैसे शिल्लक होते, तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसत होते.
गुऱ्हाळघरे, कारखाने बंद राहणार?
जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरे व साखर कारखान्यांची चिखलातून ऊस वाहतूक चालणार नाही. परिणामी, आज, बुधवारी ऊस तोड काही ठिकाणी बंद राहण्याची शक्यता आहे.