कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:43+5:302021-04-12T04:22:43+5:30
काेल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. रात्री आठ वाजता विजांचा लखलखाट व वाऱ्यासह सुमारे अर्धा तास ...
काेल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. रात्री आठ वाजता विजांचा लखलखाट व वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याने शहरात पाणीच पाणी झाले.
गेली दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहिले. रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान असले तरी उष्मा कमालीचा होता. दिवसभरात ढगांची दाटी कमी झाल्यानंतर उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत राहिल्या. सायंकाळी साडेसात नंतर पावसाचे वातावरण होऊन आठ वाजता वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. साधारणत: अर्धा तास शहराला पावसाने झोडपून काढले. वळीवाच्या पावसाने शहरात पाणीच पाणी केले. शहरातील सखल भाग, रस्त्यावर पाणी तुंबले होते.
लाॅकडाऊनमुळे दिवसभर रस्ते ओस होते. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाचा फारसा त्रास नागरिकांना झाला नाही. जिल्ह्यातही काही भागात वळीव पावसाने हजेरी लावली. रविवारी किमान तापमान २३ तर कमाल ३७ डिग्री होते. आज, सोमवारी तापमानात फारशी वाढ होणार नसली तरी ढगाळ वातावरण राहणार आहे; मात्र मंगळवार व बुधवारी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
संपूर्ण शहर अंधारात
शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रात्री सव्वाआठ वाजता शहरातील वीज गायब झाली. सुमारे अर्धा तास संपूर्ण शहर अंधारात होते.