कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस : सकाळपासूनच रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 06:05 PM2020-09-12T18:05:18+5:302020-09-12T18:06:56+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेली पाच दिवस रोज पावसाने हजेरी लावण्यास सुुरुवात केल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला, तर ग्रामीण भागातही सकाळपासून रिपरिप सुरू होती.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली पाच दिवस रोज पावसाने हजेरी लावण्यास सुुरुवात केल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला, तर ग्रामीण भागातही सकाळपासून रिपरिप सुरू होती.
शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. अनेक तालुक्यांत सकाळी आठ वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर थोडी उघडीप दिली असली तरी कोल्हापूर शहरात दुपारी साडेबारा वाजता जोरदार पावसाने झोडपून काढले. अर्धा- पाऊण तास एकसारखा पाऊस सुरू होता. त्यानंतर उसंत घेतली. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा भुरभुर सुरू राहिली.
धरणक्षेत्रातही कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ८.६६ मिलीमीटर पाऊस झाला. पन्हाळा १४.२९, राधानगरी १५, गगनबावडा १०, तर चंदगड १४.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मी बामणे यांच्या घराची पडझड होऊन तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.