कोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:08 PM2018-09-20T18:08:35+5:302018-09-20T18:10:48+5:30
कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.
गेले दोन दिवस रात्री व पहाटेही गार वारे वाहत होते. थंडीही सुुरू झाली होती. त्यामुळे पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की काय, अशी भीती व्यक्त होत होती. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ दाटून आले. ढगांचा गडगडाटही वळिवासारखा होता. बघता-बघता जोरदार पाऊस सुरू झाला. तापलेला मातीचा गंध आसमंतात भरून गेला. तासभर हा पाऊस सुरू राहिला तरी रिपरिप मात्र बंद झाली नव्हती.
एवढ्या लवकर पाऊस जाणे परवडणारे नव्हते; कारण पिकांना अजूनही पावसाची गरज आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मध्ये थांबलाच नाही. तब्बल ५० दिवस तो एकसारखा पडत होता. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले होते. पिकांची वाढही थांबली होती. ‘नको आता पाऊस’ असे म्हणण्याची वेळ आली होती. हा पाऊस आॅगस्टच्या अखेरीस थांबला. तो असा थांबला की आॅक्टोबरसारखा उन्हाचा तडाखा सुरू झाला.
सुरुवातीला पंधरा दिवस पिकांनाही ते पोषक होते; परंतु जसजशी उघडीप वाढली तशी पिके अडचणीत येऊ लागली होती. आता जिल्ह्यात भात पोटरी भरण्याची स्थिती आहे. सुरुवातीला धूळवाफ पेरणी झालेले भात बाहेर पडले आहे. भुईमूगही शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची काढणी मात्र अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. ऊस वाळू लागला नसला तरी त्यालाही पाण्याची गरज होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविली तरी सर्व प्रश्न निसर्गाने एका तासात सोडविले.