कोल्हापूरसह सांगलीत जोरदार पाऊस

By admin | Published: May 4, 2017 11:37 PM2017-05-04T23:37:14+5:302017-05-04T23:37:14+5:30

विजांचा कडकडाट अन् वादळी वारे : वीजपुरवठा खंडित; शिराळ्यात गारपीट

Heavy rain in Sangli with Kolhapur | कोल्हापूरसह सांगलीत जोरदार पाऊस

कोल्हापूरसह सांगलीत जोरदार पाऊस

Next


कोल्हापूर : विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाने गुरुवारी कोल्हापूरसह सांगलीला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने या परिसरात हजेरी लावली.
गुरुवारी सायंकाळनंतर कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर शहर परिसरात अर्धा तास पाऊस झाला. मलकापूर (ता.शाहूवाडी) येथे पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
झाडे कोसळली,
विजेच्या तारा तुटल्या
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसाने गुरुवारी सांगली शहरासह वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली. खानापूर पूर्वभागातही मध्यरात्री गारा पडल्या.
सांगली शहरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांची दाटी झाल्याने अंधारून आले. त्यानंतर लगेच वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षा वादळी वाऱ्याने सर्वांचे हाल झाले. झाडे कोसळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीस मिनिटात वळीवाने जनजीवन विस्कळीत केले.
सिंधुदुर्गात दमदार पाऊस
सिंधुदुर्ग :जिल्ह्यातील बहुतांशी भागात गुरूवारी सायंकाळी मेघगर्जेनेसह दमदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि परिसरात मोठी पडझड झाली होती. मेघगर्जेनेसह पाऊस पडल्याने सायंकाळी ६ पासून जिल्ह्याच्या सर्वच भागात वीज पुरवठा बंद झाला होता. वैभववाडी, तसेच कणकवली तालुक्यातील तळेरे परिसरात गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसाने लग्न सराईसह गावागावातील सार्वजनिक कार्यक्रमांवर विरजण पडले आहे.
मोटारीवर झाड कोसळले
नूतन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या खासगी मोटारीवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलसमोर गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.


वीज कोसळून बालकाचा मृत्यू; पिता गंभीर
चंदगड (जि.कोल्हापूर) : जंगमहट्टी येथे मयूरेश सुरेश तुप्पट (वय ५) या अंगणवाडीतील बालकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावाच्या वेशीत घडली. सुरेश तुकाराम तुप्पट मुलगा मयुरेशसह दुचाकीवरून पाटणेफाटा येथे असलेल्या पत्नीला आणण्यासाठी जात होते. ते गावाच्या वेशीत आल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सुरेश दुचाकी थांबवून एका झाडाखाली थांबले होते. यावेळी या दोघांवर वीजकोसळली. यात सुरेश हे बेशुद्ध पडले, तर मयूरेशचा मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या महिलांनी ही घटना पाहिली.

ंअंकलीत भिंत पडून शेतमजूर जागीच ठार
सांगली : वादळी वाऱ्यामुळे शेतातील सिमेंटच्या विटांची भिंत अंगावर पडल्याने अंकली येथील श्रीकांत पायगोंडा पाटील (वय ६०) हा शेतकरी जागीच ठार झाला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.

Web Title: Heavy rain in Sangli with Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.