कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला; पुराची पातळी घसरली; अद्याप ६३ मार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:57 AM2024-07-29T11:57:36+5:302024-07-29T11:58:17+5:30
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल, रविवार पासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणातील विसर्गही कमी झाल्याने पुराच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी कमी झाली असून, कोल्हापूर शहरात घुसलेले पाणीही कमी होऊ लागले आहे. अद्याप पूरस्थिती कायम असली, तरी पाऊस कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली, तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले असून, त्यातून प्रतिसेकंद ४,३५६ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होताना दिसत आहे. दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने कमी झाली असून, १२ बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत.
सोमवारसाठी ‘ग्रीन’ अलर्ट
हवामान विभागाने रविवारी ‘येलो’ अलर्ट दिला होता. त्यानुसारच पावसाची उघडझाप सुरू होती. सोमवारसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ग्रीन’ अलर्ट दिला असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोल्हापूरकरांच्या पाणी पातळीकडे नजरा
पंचगंगेची पाणी पातळी जसजशी वाढत गेली, तसतशी कोल्हापूरकरांची धाकधूक वाढत होती. रविवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी दिवसभर पुराच्या पाणी पातळीकडे कोल्हापूरकरांच्या नजरा होत्या.
पडझडीत १.३४ कोटींचे नुकसान
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ३ सार्वजनिक, तर ४५५ खासगी अशा ४५८ मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये तब्बल १ कोटी ३४ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एसटीचे ४८ मार्ग बंद
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रविवारी एसटीचे ४८ मार्ग बंद राहिले. चंदगड, गडहिंग्लज व इचलकरंजी आगारातील एसटी बसचे मार्ग सर्वाधिक बंद आहेत.
- पंचगंगेच्या पातळीत घसरण
- सध्याची पातळी : ४६.२ फूट
- बंधारे पाण्याखाली : ८३
- मार्ग बंद : ६३
- नुकसान : ४५८ मालमत्ता
- नुकसानीची रक्कम : १ कोटी ३४ लाख ४९ हजार
- कोल्हापूर ते गारगोटी : मडिलगे येथील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू
- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू आहे.