जिल्ह्यात पावसाची उघडझाप, सर्वाधिक गगनबावड्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:28 PM2020-06-15T17:28:34+5:302020-06-15T17:31:44+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे.
मान्सून सक्रिय झाला असून, शेतीला हवा तसाच पाऊस पडत आहे. खरीप पिकास उगवणीसाठी हा पाऊस पोषक असून ऊन, पाऊस होत असल्याने पिकांच्या वाढीस चांगला आहे. रविवारी रात्री जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी सकाळी पण काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. मात्र, अकरापासून उघडीप राहिली.
अधूनमधून एक-दोन सरी वगळता दिवसभर उघडीप राहिली. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.६४ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली.
धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. ओढे, नाले वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी व वारणा धरणांत २४ तासांत एक दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली, तर काळम्मावाडी धरणात तब्बल ३.३९ दशलक्ष घनमीटरने पाणी वाढले.