कमी कालावधीत प्रचंड पाऊस हे महापुराचे प्रमुख कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:30 PM2019-08-23T14:30:46+5:302019-08-23T14:36:18+5:30
कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर , सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच ...
कोल्हापूर : महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांत सरासरी ६५ टक्क्यांहून अधिक झालेला पाऊस हेच मुख्य कारण असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. याबाबत कोणीही अधिकारी अधिकृत भूमिका मांडत नसले तरी गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी केवळ पावसाची आकडेवारी आणि धरणांचा विसर्ग यांमध्येच अडकले आहेत. सातत्याने मंत्रालयातून याबाबतच्या कारणांबाबत पाठपुरावा होत असल्याने रोज नवनवीन आकडेवारी पाठविण्यामध्ये हा विभाग गुंतला आहे.
जुलैमध्ये पावसाने पाठ फिरविल्यानंतर आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. जुलैअखेर सुरू झालेल्या पावसाने ३ आॅगस्टनंतर रौद्र रूप धारण केले. एकाच वेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस सुरू झाल्याने धरणे भरण्याचा वेग वाढला. अखेर पुराची भीती दिसत असतानाही शासकीय नियमांप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
याआधी २००५ साली जो पूर आला होता, त्याच्या पाच दिवसांमध्ये जेवढा पाऊस झाला, त्या वेळेपेक्षा ६५ टक्के जादा पाऊस यावेळच्या महापुरावेळी झाला. जरी या तीनही जिल्ह्यांत हा पाऊस एकाच वेळी झाला नसता तर महापुराची तीव्रता कमी झाली असती. मात्र तीनही जिल्ह्यांत एकाच वेळी अकल्पित असा प्रचंड पाऊस झाल्याने जलसंपदा विभागाचे हात बांधले गेले.
३२५ टीएमसी पाणी गेले वाहून
या महापुराच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सर्व धरणांमधून तब्बल ३२५ टीएमसी पाणी खाली सोडले गेले. धरणांच्या सुरक्षिततेसाठी हे पाणी सोडणे गरजेचे बनले आणि त्यामुळेच महापुराची तीव्रता वाढली. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लहान-मोठ्या ६६ जलप्रकल्पांमध्ये दरवर्षी ९० टीएमसी पाणीसाठा केला जातो. मात्र गेल्या आठवड्यात पुराच्या काळात या ६६ जलप्रकल्पांमधून एकूण २०० टीएमसी पाणी खाली सोडावे लागले आहे. त्याबरोबरच अलमट्टीची फुग, कोल्हापूर, सांगली शहरांत झालेली पूरस्थितीतील बांधकामे अशा अनेक कारणांमुळे ही तीव्रता वाढल्याची चर्चा जलसंपदा विभागात आहे.
मंत्रालयातून सातत्याने माहितीची मागणी
पूर सुरू झाल्यापासून रोज मंत्रालयातून पडणारा पाऊस, गेल्या काही वर्षांमधील सरासरी, गेल्या काही वर्षांमधील धरणांतील पाण्याचा विसर्ग, २००५ च्या पुराची स्थिती, तेव्हाचा पाऊस, तेव्हाचा धरणांतील विसर्ग ही माहिती सातत्याने मागविली जात आहे. त्यामुळे गेले १५ दिवस या विभागाचे अधिकारी याच कामात आहेत. आता पुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समितीची स्थापना झाल्याने लवकरच या समितीचा दौराही होण्याची शक्यता आहे.