जिल्ह्यात धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:22+5:302021-07-22T04:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत वेगाने वाढ होत असून, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी ३३ फुटांपर्यत पोहोचली असून, इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. एक राज्य व दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून, ३९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारपासून दोन दिवस धुवाधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी तर त्यात वाढ होत जाऊन अक्षरश: सुपाने पाणी ओतावे तशा पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. नाले तुडुंब झाल्याने पाणी सैरभैर झाले होते. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात तर एकसारखा धुवाधार पाऊस राहिल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.
पंचगंगेची पातळी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सायंकाळी सातपर्यंत ३३ फुटांवर पातळी पोहोचली आणि इशारा पातळीकडे आगेकुच ठेवली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. ‘वारणा’ धरणाच्या साठ्यात दिवसभरात ३ टीएमसीने वाढ झाली. सध्या हे धरण ७१ टक्के भरले आहे. ‘राधानगरी’तून प्रतिसेकंद १४२५, तर ‘वारणा’ मधून १७१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज, गुरुवारीही जिल्ह्यात धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गारठ्याने अंगात हुडहुडी
पावसाला कमालीचा गारठा आहे. कमाल तापमान २० डिग्रीपर्यंत खाली आल्याने दिवसभर अंगातून हुडहुडी गेली नाही. जोरदार पाऊस आणि गार वाऱ्यांमुळे वयोवृध्दांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.
बांधफुटीमुळे शेतीचे नुकसान
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस राहिल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. ऊस, भात पिकाचे बांधफुटीचे प्रकार अनेक ठिकाणी झाले असून, त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पंचगंगेच्या पातळीत तासाला पाऊण फुटाची वाढ
सकाळपासून पावसाचा जोर असला, तरी दुपारनंतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. पंचगंगा नदीची पातळी बुधवारी सकाळी आठ वाजता २८ फुटांवर होती. दुपारी चार पर्यंत ३३ फुटांवर, तर सायंकाळी सात वाजता ३५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे तासाला पाऊण फुटाने वाढ होत गेली.