गगनबावड्यात अतिवृष्टी, कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:57 PM2020-06-13T15:57:32+5:302020-06-13T15:58:50+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात ४१०.४४ मिली मीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली असून येथे तब्बल १०९.५० मिली मीटर पाऊस झाला. सकाळी पावसाची रिपरिप होती, दुपारी काहीसी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मान्सून सक्रीय झाला. दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर काहीसा वाढत गेला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. शनिवारी सकाळी आठ पर्यंत सरासरी ३४.२० मिली मीटर पाऊस झाला.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यात अद्याप हलक्या सरीच कोसळत आहेत. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असली तरी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यात दुपारपर्यंत काहीसी उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस असून नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी १०.३० फुटापर्यंत आहे.