गगनबावड्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 07:02 PM2020-09-23T19:02:48+5:302020-09-23T19:03:59+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली. मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळ पासून रिपरिप राहिली, मात्र काही काळ उघडीपही होती. दुपारी ऊन , पावसाचा खेळ सुरू होता. सांयकाळ नंतर अधून मधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने विसर्ग वाढला आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ४२५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीची पातळीत वाढ झाली आहे. ह्यभोगावतीह्णचे पाणी पात्राबाहेर पडले असून पंचगंगेची पातळीही १५ फुटावर पोहचली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.०८ मिली मीटर पाऊस झाला.
यामध्ये हातकणंगले ५.७५, शिरोळ ४.४३, पन्हाळा २०.७१, शाहूवाडी ११.६७, राधानगरी २९.५०, गगनबावडा १००.५०, करवीर २१.९१, कागल १८.४९, गडहिंग्लज ७.२९, भुदरगड ३४.४०, आजरा ३४.६७, चंदगड ४४.६७ मिली मीटर पाऊस झाला. दरम्यान, आज, गुरूवारीही जिल्ह्यात पावसाची रिपरिप राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.