कोल्हापूरला मान्सूनपुर्व पावसाने झोडपले, जोरदार वाऱ्यासह गारांचा मारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:51 PM2022-06-02T17:51:08+5:302022-06-02T17:57:25+5:30
कोल्हापूर : जोरदार वारे व गारासह आज, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या मान्सूनपुर्व सरींनी दमदार हजेरी लावली. या पावसाच्या सरीमुळे दिवसभराच्या ...
कोल्हापूर : जोरदार वारे व गारासह आज, गुरुवारी संध्याकाळी आलेल्या मान्सूनपुर्व सरींनी दमदार हजेरी लावली. या पावसाच्या सरीमुळे दिवसभराच्या उष्म्यानंतर सुखद अनुभूती दिली. मात्र, कडकडणाऱ्या विजांच्या थयथयाटाने कोल्हापुरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आणला. पावसामुळे क्षणार्धात रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाहू लागले तर जनजीवन जागच्या जागी स्तब्ध झाले. पावसाचा मारा इतका प्रचंड होता की दाट धुके पडल्यासारखे वातावरण झाले होते.
कोल्हापुरात मान्सुनचे आगमन १० जूनपर्यंत लांबले असले तरी काल, बुधवारी संध्याकाळपासून मान्सूनपुर्व सरींचे आगमन झाले आहे. काल, कुठे ढग उतरतील तिथे पाऊस झाला. शहरात किरकोळ सर वगळता मोठ्या पावसाने हुलकावणीच दिली होती. आज, गुरुवारी संध्याकाळी ही सर्व कसर भरुन निघाली.
पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह वरुणराजाचे आगमन झाले. विजांचा थयथयाट सुरु झाला. सोबत जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. लगेच गाराही पडू लागल्या. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की समोरचे काही दिसतच नव्हते. तासभर पावसाने अक्षरशा धुवून काढले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती.