कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:31 PM2022-07-04T17:31:07+5:302022-07-04T20:29:34+5:30
शेती कामाला जोर आला
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने आज, सोमवारी सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने दुपारी मात्र उघडीप घेतली. पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे नदी, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर, शेती कामाला जोर आला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्यापाणी पातळीत वाढ झाली असून तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रुई, इचलकरंजी व सागळी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीतही वाढ झाली. अखेर सायंकाळी राजाराम बंधारा आणि शिंगणापूर बंधारा ही पाण्याखाली गेला. त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे.
भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवण्याची विनंती करुन टोल फ्री क्रमांक १०७७ व जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४ देण्यात आले आहेत.