कोल्हापुरात वळवाचा जोरदार पाऊस, सहा ठिकाणी झाडे पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:41 PM2021-05-04T18:41:36+5:302021-05-04T18:42:41+5:30
Rain Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. आधी जोरदार वारे सुटले. विजांचा लखलखाट आणि कडकडाट सुरू झाला. सुमारे पाऊण तास जोरदार पावसाने शहराला झोडपले. उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडताच त्याचा दर्प सुखावणारा होता. या जोरदार पावसाने शहराच्या रस्त्यावरून, रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीतून पाणी वहायला लागले, सखल भागात तर पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी गटारी, चॅनेल तुंबल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर आले.
मंगळवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या वळवाच्या पावसामुळे कोल्हापूर शहरात सहा ठिकाणी झाडे पडली. रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस या रस्त्यावर एक झाड उन्मळून पडल्यामुळे काही काळ बालिंगा, कुडित्रे तसेच कोकणाकडे जाणारी वाहतूक थांबली. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली.
शहराबरोबरच शहरालगतच्या करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातही जोरदार पाऊस पाऊस झाला. ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.