कोल्हापुरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:36+5:302021-05-24T04:24:36+5:30
कोल्हापूर : शहर आणि परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत राहिल्याने शहरातील सखल ...
कोल्हापूर : शहर आणि परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत राहिल्याने शहरातील सखल भागांतील रस्ते, गटारी वाहू लागल्या. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला.
रविवारी सकाळपासून प्रचंड उष्णता होती. अंगाची लाही-लाही होत राहिली. दरम्यान, अचानकपणे रात्री दहाला आकाशात ढगांची गर्दी झाली. १०.३० वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. तो जोरदार पडत असल्याने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरभर पाणी साचले. जोरदार सरी असल्याने सखल भागांतून पाणी वाहू लागले. सरीवर सरी येत त्याने अक्षरश: झोडपून काढले.
शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले. दुचाकी वाहनधारकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी मिळेल तिथे आसरा घेतला. अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले. जयंती नाल्यातील पाण्यातही वाढ झाली. काही वेळ शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. उष्णतेने हैराण झालेल्यांना काही कालावधीसाठी का असेना, दिलासा मिळाला. ऊसपिकासाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. शिवाय खरीप पूर्वमशागतीच्या कामांनाही उपयुक्त ठरणार आहे. मशागतींच्या कामांना वेग येणार आहे.