कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शिवारात, झोपडीत पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:45 AM2021-12-02T11:45:31+5:302021-12-02T11:49:01+5:30
जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती.
कोल्हापूर : जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती. तर आज, गुरुवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली. या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकरी चिंतेत आहे. शिवारातील कामे खोळंबली आहेत. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाल्यासह रबीलाही तडाका बसणार आहे.
अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. रस्ते जलमय झाले आहेत तर शिवारात पाणीच पाणी झाले आहे. यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरु सुरु असल्याने ऊस तोड मजूर कारखानास्थळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या झोपडीत पाणीच पाणी झाल्याने त्यांचे हाल झाले. अनेक मजूरांनी रात्र जागून काढली.
सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर दहानंतर पुन्हा ऊन पडले होते. यामुळे वातावरणात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र होते. वातावरणातील या बदलाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे आजारपणात वाढ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेली तीन-चार दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने 'जेवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.