कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; एकाचा मृत्यू-पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:16 AM2018-07-13T01:16:22+5:302018-07-13T01:18:12+5:30
जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली.
कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली.
अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने गगनबावडामार्गे; तर पाणीपातळीत वाढ झाल्याने राज्य व प्रमुख जिल्हा अशा आठ मार्गांवरील वाहतूक अंशत: बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. शहरात सकाळपासून संततधार सुरू असल्याने सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते. सर्व भाजी मंडया ठप्प राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
शहरातील भाजी मंडयाही ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली. या पावसाने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला होता. पंचगंगा नदीचे पाणी दुसºयांदा पात्राबाहेर आले असून ते पाहण्यासाठी नागरिकांनी सायंकाळी गर्दी केली. या पावसाने जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होऊन ती अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. तसेच राज्य व प्रमुख अशा आठ मार्गांवरील वाहतूक अंशत: किंवा बंद करून ती पर्यायी मार्गांनी वळविली. कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे ती गगनबावडामार्गे वळविण्यात आली. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १२५, दूधगंगा ८४, पाटगाव १४२, घटप्रभा १०९, तर कोदे धरणक्षेत्रात २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘राधानगरी’तून प्रतिसेकंद १६००, ‘कडवी’मधून १८०, ‘कुंभी’मधून ३५०, ‘घटप्रभा’मधून ३५२२, ‘जांबरे’तून १२४९, तर कोदे धरणातून ८१८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची राजाराम बंधाºयाजवळील पाणीपातळी गुरुवारी सायंकाळपर्यंत ३३.८ फुटांवर राहिली.
जिल्ह्यात ३७.१५ मि.मी. पाऊस
गुरुवारी सकाळी आठपर्यंत नोंद झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा - हातकणंगले (५.८८), शिरोळ (४.५७), पन्हाळा (३२.७१), शाहूवाडी (५७.६६), राधानगरी (४७.००), गगनबावडा (९१.००), करवीर (१९.१८), कागल (२१.५७), गडहिंग्लज (२३.२८), भुदरगड (५५.८०), आजरा (५०.००), चंदगड (३७.१६).
जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली
धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील ७, भोगावती नदीवरील ४, तुळशीवरील १, कासारीवरील ९, कुंभीवरील २, दूधगंगेवरील २, वेदगंगेवरील ८, ताम्रपर्णीवरील ४, घटप्रभावरील २, धामणीवरील २, कडवीवरील ८, वारणावरील २ बंधारे पाण्याखाली गेले.
पडझडीत अडीच लाखांचे नुकसान
मुसळधार पावसाने साळगाव (ता. आजरा) येथील गणपती भीमा मांग यांच्या घराच्या भिंतीची अंशत: पडझड होऊन १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच मालेवाडी (ता. शाहूवाडी) येथील विष्णू रामचंद्र चिंचावडेकर यांच्या घराची भिंत कोसळून आठ हजार रुपये, आमरोळी (ता. चंदगड) येथील लक्ष्मण धोंडिबा मोरे यांच्या घराची पडझड होऊन अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर भुदरगड तालुक्यात पक्क्या घराच्या चार भिंती, कच्च्या घराच्या सहा भिंती व गोठ्याच्या एका भिंतीचे नुकसान झाले.
जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा आजचा व एकूण टी.एम.सी.मध्ये पुढीलप्रमाणे : राधानगरी - ५.२६ (८.३६१ एकूण पाणीसाठा), तुळशी २.२४ (३.४७१), वारणा २३.८३ (३४.३९९), दूधगंगा १४.३५ (२५.३९३), कासारी २.०० (२.७७४), कडवी १.९८ (२.५१५), कुंभी १.८३ (२.७१३), पाटगाव २.४१ (३.७१६), चिकोत्रा ०.२९ (१.५२२), चित्री ०.९५ (१.८८६), जंगमहट्टी ०.६३ (१.२०८), घटप्रभा १.५६ (१.५४५), जांबरे ०.८२ (०.८२०), कोदे ०.२१ (०.२१४).
अणदूर बंधारा पाण्याखाली
साळवण : सलग पाचव्या दिवशीही गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील वेतवडे, मांडुकली व अणदूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वेतवडे, अणदूर, मणदूर, मांडुकलीसह अन्य वाड्यावस्त्यांची वाहतूक कोलमडली असून, त्यांना मार्गेवाडी मणदूर पुलावरून ये-जा करावी लागते आहे.
चंदगडला चार बंधारे पाण्याखाली
चंदगड : ताम्रपर्णी, घटप्रभा नद्या दुथडी भरून वाहत असून, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, कोनेवाडी, तर घटप्रभा नदीवरील गवसे, हिंडगाव हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे आजरा व दोडामार्ग वाहतूक बंद आहे. दोडामार्ग-गोव्याला जाणाºया बसेस पाटणे फाटा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाने कमळाबाई गावडे (तुर्केवाडी) यांच्या घराच्या दोन भिंती, रत्नाबाई कांबळे (शिरगाव) यांच्या व दत्तू कांबळे (चंदगड) यांच्या घराची भिंत कोसळून तर लक्ष्मण धोंडिबा मोरे (अमरोळी) यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
भिंत कोसळून नुकसान
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्याने शहरातील बिलावर वाड्यातील काशव्वा शंकर बिलावर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी व घटप्रभा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्व भागातील दुबार पेरणीचे संकट टळले असून, धोक्यात आलेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. तालुक्यात गुरुवारी दिवसभरात २३.५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ
नृसिंहवाडी/कुरुंदवाड/जयसिंगपूर : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत दोन फुटांनी वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे, तर नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराजवळ कृष्णा नदीचे पाणी आले आहे.
नृसिंहवाडी परिसरात दमदार पाऊस झाल्याने पेरणी करून पावसाची वाट पाहत असलेला बळिराजा आनंदात आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. जयसिंगपूर येथील शाहूनगरमध्ये आठवडा बाजारात भरपावसातदेखील गर्दी दिसत होती.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा व कृष्णेची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस असला तरी शिरोळ तालुक्यात मोठा पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. धरण क्षेत्रात कोसळणाºया पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यातच शिरोळ तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने कृष्णा व पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
इचलकरंजीत जुन्या पुलावरून वाहतूक बंद
इचलकरंजी : शहर व परिसरामध्ये गुरुवारी मान्सून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, येथील पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, यंदा प्रथमच पुराचे पाणी पात्राबाहेर पडले.
येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी बुधवारी (दि. ११) सायंकाळी ५५ फूट होती, ती गुरुवारी साडेसत्ताव्वन फूट इतकी झाली. पुराच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पंचगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. नगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्था पथक पंचगंगा नदीतीरावर तैनात केले आहे. गुरुवारी रात्री उशिरा लहान पुलावर पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
शाहूवाडीत नऊ
बंधारे पाण्याखाली
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पावसाची संततधार जोरात वाढली असून, धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नऊ बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कासारी नदीवरील पेंडाखळे, बाजार भोगाव, वाळोली, पुनाळ, ठाणे-आळवे या बंधाºयांसह जांभळी नदीवरील किसरुळ- मुगडेवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. शेतशिवारही जलमय झाले आहेत. पुराचे पाणी घुसण्याची शक्यता गृहीत धरून एस. के. पाटील सहकार संकुलातील गाळेधारक व्यापाºयांसह ठाणेकर वेल्डिंग सेंटर परिसरातील दुकानदारांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.