पाटगाव परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 AM2021-04-12T04:23:07+5:302021-04-12T04:23:07+5:30
भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात रविवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने अनेकांच्या दुकानांवरील व घरांवरील पत्रे ...
भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात रविवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने अनेकांच्या दुकानांवरील व घरांवरील पत्रे उडून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त असला तरी काजू व फणस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पाटगाव परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. काही ठिकाणी गारपीटही झाली, तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. शिवडाव व तांबाळे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दोन तास गारपिटीसह पाऊस झाल्याने तांबाळे येथील संतोष पिळणकर यांच्या शेती केंद्राच्या दुकानावरील पत्रे उडून २० हजारांचे नुकसान झाले. पत्रे उडून गेल्याने विक्रीसाठी आणलेले खत आणि बी-बियाणे पावसात भिजून नुकसान झाले आहे, तर युवराज मोहिते यांच्या घरावरील पत्रे उडून दहा हजारांचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा पोलीस पाटील व तलाठी यांच्याकडून करण्यात आला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी पावसामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला आहे.
फोटो -तांबाळे येथील शेती केंद्राच्या दुकानावरील वादळी वाऱ्याने पत्रे उडून नुकसान झाले.