कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची भुरभुर, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 06:23 PM2020-08-29T18:23:18+5:302020-08-29T18:25:20+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली.
कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली.
मध्यंतरी पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा सुरू झाला. शनिवारी सकाळपासून भुरभुर कायम राहिली. सकाळी दहापर्यंत तर अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
कोल्हापूर शहरात दिवसभरात हलक्या सरी तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. पावसाबरोबर थंड वारेही वाहत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.२१ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ३१.५० मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे.
वारणा ९६, तर दूधगंगा ९८ टक्के भरले
पावसाचा जोर होता, त्यावेळी वारणा व दूधगंगा या धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. आता विसर्ग कमी केल्यानंतर वारणा ९६ टक्के तर दूधगंगा ९८ टक्के भरले आहे. कुंभी (९४ टक्के) वगळता सर्वच सर्वच धरणे भरली आहेत.
केर्ली-जोतिबा रोड अद्याप बंदच
जिल्ह्यातील पुराच्या पाण्यामुळे बंद असलेले मार्ग सुरू झाले असले तरी केर्ली ते जोतिबा मार्ग खचल्याने वाहतूक बंद आहे.