जोरदार पावसाची अजूनही हुलकावणीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:08+5:302021-07-16T04:18:08+5:30

कोल्हापूर : रिमझिम का होईना पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांसह सर्वचजण सुखावले असले, तरी अजूनही जोरदार पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली ...

Heavy rains still recede | जोरदार पावसाची अजूनही हुलकावणीच

जोरदार पावसाची अजूनही हुलकावणीच

Next

कोल्हापूर : रिमझिम का होईना पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांसह सर्वचजण सुखावले असले, तरी अजूनही जोरदार पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोर होता, पण गुरुवारी तो देखील ओसरला आहे. तुरळक सरीच पडत असून, त्यातदेखील सातत्य नाही. हा संपूर्ण आठवडाभर अशीच पावसाची उघडझाप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील बुधवारपासून म्हणजेच म्हाताऱ्या पावसाचे नक्षत्र सुरू झाल्यानंतरच खऱ्याअर्थाने पावसाला जोर चढणार आहे.

तब्बल तीन आठवड्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनचा पाऊस चार दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. रिमझिम स्वरुपात आगमन केलेल्या पावसाचा जोर वाढेल, असा कयास बांधला जात होता, पण चार दिवस झाले तरी जोरदार पाऊस झाला नाही. पिके जगवण्यापुरता आणि आंतरमशागती करता येतील इतकाच पाऊस पडला आहे. सध्या ऊस व भातासारख्या पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

गुरुवारी सकाळी तर चक्क कडकडीत ऊन पडले. त्यानंतर पुन्हा आभाळ भरून आले; पण ढग उतरेल तेथेच तुरळक सरींवर समाधान मानावे लागले. दिवसभर अशीच एखाददुसरी सर येत होती. संध्याकळी पुन्हा एकदा वातावरणात गारवा तयार झाला, पण अगदीच तुरळकच पाऊस झाला.

पावसाचा जोर ओसरला असला तरी गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही दिवसभरात तीन फुटांनी वाढ झाली. बुधवारी २४ फुटांवर असणारी पंचगंगा राजाराम बंधाऱ्याजवळ गुरुवारी २७ फुटांवर पोहोचली.

१८ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदी ७ : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती ४ : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे

कासारी ३ : यवलूज, ठाणे, आळवे

कुंभवरील ४ : कळे, शेणवडे, सांगशी, मांडूकली,

दुधगंगा १ : दत्तवाड

फोटो: १५०७२०२१-कोल- पाऊस ०१

फोटो ओळ : गुरुवारी दिवसभर पावसाची उखडझाप राहिली, तरीदेखील बुधवारी रात्री पडलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पंचगंगा घाटावर वरच्या शेवटच्या पायरीलगत पाणी आले.

Web Title: Heavy rains still recede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.