कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे बर्की बंधारा पाण्याखाली, धबधब्याकडे गेलेले पर्यटक अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:55 PM2022-07-04T18:55:56+5:302022-07-04T18:56:43+5:30
बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.
दशरथ आयरे
अणूस्कुरा : मागील दोन दिवसांपासून शाहूवाडी पश्चिम भागात अणूस्कुरा व गेळवडे धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कासारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुसळधार पावसामुळे बर्की धबधबा प्रवाहीत झाल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परंतु अचानक पाऊस वाढल्यामुळे बर्की बंधारा पाण्याखाली गेला अन् पर्यटक गावातच अडकले.
पर्यटक सकाळीच बर्की धबधब्याकडे गेले होते. राजापूर-कोल्हापूर रोड लगत बर्कीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावर कमी उंचीचा अरुंद पूल आहे. त्या पुलावर गेळवडे परिसरात पाऊस झाल्यास लगेच पाणी चढते. त्यामुळे साधारणपणे पन्नास ते साठ पर्यटक दुपारपासून बर्कीमध्ये अडकून पडले आहेत. बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नसल्यामुळे बंधाऱ्यावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.
पुढील दोन-दिवस असाच पाऊस राहिल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शाहूवाडी महसूल विभागाकडून कासारी नदी परिसरातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्की धबधब्याकडे पर्यटकांनी येऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.