निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:51 PM2020-08-03T16:51:29+5:302020-08-03T16:57:49+5:30

बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे.

Heavy sales of substandard cashews in the city | निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

Next
ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्रीशहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जागोजागी विक्रीचे स्टॉल

कोल्हापूर : बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे या काजूबियांविषयी जाणकारांकडून माहिती घेतल्यानंतर हा निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा दर्जा तपासून घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोणतीही वस्तू घरापर्यंत पोहोचवण्याचे काम विक्रेते चोख पार पाडू लागले आहेत. विक्री होणाऱ्या वस्तूंचा दर्जा कोठेही तपासला जात नाही. यातून अनेक वेळा खाद्यपदार्थांची होणारी विक्री आरोग्यास हानिकारक ठरू शकते. असाच प्रकार सध्या शहरातील अनेक ठिकाणी घडत आहे.

काही विक्रेते निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची विक्री कमी किमतीत करीत आहेत. सामान्य जनतेसाठी काजूचा वापर वाढत्या किमतीतून दुरापास्त झाला आहे. एक किंवा दोन काजूबिया खायला मिळणे म्हणजे भाग्याचे काम आहे.

सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या काजूबियांचा दर ७०० ते ८०० रुपये किलो असा आहे. याचाच परिणाम म्हणून अजाणतेपणाने नागरिक रस्त्याच्या कडेला टेम्पो अथवा स्टॉल लावून प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपये किलो अशा दराने काजूबियांची विक्री करीत आहेत.

कमी किमतीत मिळते म्हटल्यानंतर अनेकजण त्याचा दर्जा न तपासताच ती वस्तू खरेदी करण्याकडे आकर्षित होतात. अशाच प्रकारे सध्या निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विकल्या जात आहेत. काही प्रमाणात तुरट असणाऱ्या या काजूबियांमुळे घसा खवखवणे असे शरीरास अपाय होऊ शकतात.

विशेष म्हणजे हा काजू आजरा, चंदगड, तळकोकणातील काजू कारखान्यांतून खराब दर्जाचा म्हणून बाजूला ठेवलेला असतो. कमी किमतीत हा माल आणून काहीजण त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून अशा प्रकारे शहरासह ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत.

कोरोनामुळे आधीच सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याचे गांभीर्य जाणून आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने अशा निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


चांगल्या काजूबियांचा भाव प्रतिकिलो ७००-८००, तर काजू पाकळीचा दर ६०० रुपये किलो व तुकडा काजूचा भाव ५५० रुपये प्रतिकिलो आहे. सध्या रस्त्याच्या कडेला पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या काजूबिया म्हणजे कारखान्यांतून नाकारलेला व आतून कीड लागलेला माल आहे. त्यामुळे हा माल तेलकट व खाल्ल्यानंतर घसा खवखवणे असे प्रकार होत आहेत.
- चिंतन शाह,
ड्रायफ्रुटस‌्चे घाऊक व्यापारी

Web Title: Heavy sales of substandard cashews in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.