‘आयर्विन’वरील अवजड वाहतुकीस अखेर बंदी

By admin | Published: August 6, 2016 12:35 AM2016-08-06T00:35:24+5:302016-08-06T00:35:48+5:30

सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार

The heavy traffic on 'Irwin' is finally banned | ‘आयर्विन’वरील अवजड वाहतुकीस अखेर बंदी

‘आयर्विन’वरील अवजड वाहतुकीस अखेर बंदी

Next

सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शुक्रवारी तातडीने बैठक घेऊन, सांगलीतील आयर्विन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. एसटीसह सर्वच जड वाहनांना या पुलावर बंदी घालण्यात येणार असून, येत्या २४ तासांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.
जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. यात सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलाचे आयुर्मान पूर्ण झाल्याबाबतचे पत्र यापूर्वीच ब्रिटिश प्रशासनाने पाठविले होते.
वण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र, महाडच्या दुर्घटनेमुळे जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.
सांगली संस्थानने पुण्याकडे जाण्यासाठी या पुलाची उभारणी केली होती. या पुलाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९२९ ला गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन व लेडी आयर्विन यांच्याहस्ते झाले होते. सांगली शहरालगत असलेल्या या आयर्विन पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे, तर पुलाची उंची ७० फूट आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून पुलावरील वाहतुकीत झालेली वाढ आणि पुलावरही दुरवस्था होत होती. पुलाला तडे जाण्याबरोबरच दगडही निसटल्याने धोका वाढत चालला असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. या पुलाला पर्यायी पूल बायपास रस्त्यावर बांधला असून त्याचा वापर कमी होत आहे. अखेर महाड दुर्घटनेनंतर का होईना, प्रशासनाला जाग येऊन हा निर्णय घेतल्याने सांगलीचे वैभव म्हणून ओळख असलेल्या आयर्विन पुलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असून, प्रसंगी जिल्हा नियोजन समितीतून निधीची उपलब्धता करून हे आॅडिट पूर्ण करण्यात येणार आहे. अंकली येथील पूल आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांना याबाबतचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फोटो : ०५ एसएन ५ :
सांगलीत शुक्रवारी जिल्ह्यातील जुन्या पुलांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी डावीकडून महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार
आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीच्या बंदीमध्ये एसटीचाही समावेश असल्याने बायपास पुलावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे एसटीची सहा रुपयांची भाडेवाढ होणार आहे. या पुलाच्या वापरामुळे ४.१ किलोमीटर अंतर वाढणार आहे. जुन्या मार्गावरून ३६१ फेऱ्या चालतात. तिकीट दरात वाढ होणार असली तरी, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The heavy traffic on 'Irwin' is finally banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.