बोचऱ्या वाऱ्यांनी कोल्हापुरात गारठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 02:46 PM2020-02-08T14:46:07+5:302020-02-08T15:00:27+5:30
कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला.
कोल्हापूर : कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला.
कोल्हापूरकरांनी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता या वर्षी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतलाच नाही. आता उन्हाळा तोंडावर असताना जाता-जाता तरी कडाक्याची थंडी जाणवेल, या आशेवर कोल्हापूरकर होते.
गेल्या चार दिवसांपासून दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सलग तीन दिवस दाट धुके पडले. गेले आठवडाभर पहाटे दव पडण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे सकाळी काही काळ गारठा जाणवत होता; पण दिवसभर पुन्हा उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली होती.
शुक्रवारी मात्र अचानक थंडी जाणवू लागली. बोचरे वारे वाहत असल्याने अधिकच हुडहुडी भरली. दिवसभर हवेत गारवाच राहिला. किमान तापमान १५.५ सेल्सिअस अंशांवर आले. मागील दोन दिवसांपूर्वी ते १७ सेल्सिअस अंशांवर होते. कमाल तापमानही २८ च्या पुढे गेले होते.
या संदर्भात हवामान खात्याकडे विचारणा केली असता, सध्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात काही ठिकाणी शीत लहर तर काही ठिकाणी पाऊस असे वातावरण आहे. दक्षिण भारतातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात मोडणाऱ्या कोल्हापुरात सध्या हवामान कोरडे आणि अंशत: ढगाळ असेच आहे. किमान तापमानात वाढच होणार असल्याचे आकडे सांगत आहेत. ते कमाल ३० ते ३२ पर्यंत, तर किमान १४ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.
दिनांक २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. भारतीय कालगणनेनुसार शिवरात्रीला थंडीचा महिना संपून उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे आता थंडीचा महिना संपण्यासाठी शेवटचे १२ दिवस राहिले आहेत. शेवटी-शेवटी थंडी आपला रंग दाखवणार की उन्हाच्या झळा तीव्र होणार, ते कळणार आहे
स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थेने तर सध्या भारतात विचित्र हवामानाचा अनुभव येत असल्याचे नमूद करताना महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळेच सध्या राज्यात वातावरणात झपाट्याने बदल झाला आहे. कोल्हापुरात काहीसा गारठा, तर विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाजही ‘स्कायमेट’ने दिला आहे.