गडहिंग्लजमध्ये 'ही' आस्थापने ५ वाजेपर्यंतच खुली राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:29+5:302021-04-16T04:25:29+5:30
गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता धडपडणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी गडहिंग्लज शहरातील सर्व शेती सेवा केंद्रे, किराणा दुकाने आणि बेकरी ...
गडहिंग्लज :
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता धडपडणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी गडहिंग्लज शहरातील सर्व शेती सेवा केंद्रे, किराणा दुकाने आणि बेकरी व स्वीट मार्टस् ही आस्थापने गुरुवार (१५) पासून सायंकाळी ५ वाजता बंद करण्याचा निर्णय गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
औषध व दूध विक्री केंद्रे वगळता अत्यावश्यक सेवेतील शेती सेवा केंद्रे, किराणा, बेकरी व स्वीट माटर्सची दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे; परंतु जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या निमित्ताने नागरिकांची शहरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य व्हावे, म्हणून संबंधित व्यापाऱ्यांनी स्वत:हून हा निर्णय तातडीच्या बैठकीत घेतला.
बैठकीस गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश बोरगावे, बेकरी व स्वीट मार्टस् असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कोळकी, शेती सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घेज्जी, चंद्रकांत तेलवेकर, राजेंद्र बस्ताडे, शिवानंद कोरी, दर्शन सोळंकी आदी उपस्थित होते. बैठकीनंतर या निर्णयाची माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना देण्यात आली.