अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:32+5:302021-09-27T04:26:32+5:30

जयसिंगपूर : कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा. कृष्णा, दुधगंगा, ...

The height of Almatti dam should not be increased | अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये

Next

जयसिंगपूर : कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा. कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधकाम कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापूर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनांसाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेट्टी यांना बैठकीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, सीमा भागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराची पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. २००५, २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलल्याचे जाणवून आले आहे.

कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पुलांच्या दोन्ही बाजूस दोन-दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नद्यांचे पाणी पात्रापासून दोन-दोन किलोमीटर पसरते. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात. म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. यावेळी मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, संजय पाटील, कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर उपस्थित होते.

कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा-वेदगंगा नदीवरील पुलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असून चिकोडी तालुक्यातील अंकली-मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकणंगले, चिकोडी व निपाणी तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधाव्यात, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा केली.

Web Title: The height of Almatti dam should not be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.