वारस..बेवारस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:37 AM2018-08-28T00:37:23+5:302018-08-28T00:37:26+5:30
- चंद्रकांत कित्तुरे
सध्याच्या गतिमान युगात सगळेच गतिमान झाले आहेत. एकमेकांसाठी द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. आपली संस्कृती एकत्र कुटुंब पद्धतीने राहण्याची. तीही आता लयाला जाऊ पाहात आहे. ग्रामीण भागात ती थोडीफार दिसत असली तरी शहरी भागात मात्र एकत्र कुटुंबे अभावानेच आढळतात. लग्नानंतर अगदी आई-वडीलही घरात नकोसे वाटू लागतात. त्यातूनच घरामध्ये भांड्याला भांडे लागते. सासू-सुनांचा वाद गल्ली-बोळांत चर्चिला जाऊ लागतो. सुशिक्षित कुटुंबांमध्ये आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढू लागले आहेत. पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असणे, आई-वडिलांकडे पाहायला कुणी नाही ही सबबही त्यासाठी सांगितली जाते. खरंतर ‘आम्ही दोघं राजा-राणी’चं जीवन त्यांना जगायचं असतं. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात पाठविण्याचे प्रमाणही भलतेच वाढले आहे. मुले परदेशात आणि त्यांचे जन्मदाते भारतात, अशी अनेक उच्चभ्रू कुटुंबे
पाहायला मिळतात. वृद्धापकाळात ज्यांनी आधाराची काठी बनायचे तेच परदेशात असतील तर त्यांच्या आठवणीने झुरण्याशिवाय या माता-पित्यांपुढे पर्याय नसतो. त्यातच पत्नी अथवा पती देवाघरी गेला, तर एकाकीपण खायला उठते. अशावेळी नातेवाइकांचा आधार मिळाला तर ठीक; अन्यथा वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो. हे सगळे आता सांगायचे कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. गोधमगावकर यांचा वृद्धाश्रमात झालेला मृत्यू अन् त्यानंतर त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या. त्यांचा मुलगा, मुलगी दोेघेही अमेरिकेत होते. त्यांनी अंत्यसंस्काराला येण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे वृद्धाश्रमचालकांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. वारसदार असूनही बेवारसासारखे जाणे त्यांच्या वाट्याला आले. अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या. त्या वाचून अनेकांची मने हळहळली. वृद्ध मातापिता आणि त्यांची मुले यांच्यातील संबंधावर खूप चर्चा घडवल्या गेल्या. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. डॉ. धामणगावकर यांच्या लहान बंधूने त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. यावेळी मुले नसली तरी इतर नातेवाईक हजर होते. अशा आशयाची एक पोस्ट त्यांचे एक नातेवाईक राजेंद्र जोशी यांनी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केली आहे. हे खरे असले तरी अशी विपरीत चर्चा व्हायला नको होती, हे मान्यच करावे लागेल. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पालघर जिल्ह्यातही एक घटना अशीच घडली. एका वृद्ध महिलेच्या निधनानंतर शेजाºयांनी तिच्या अहमदाबाद येथे राहणाºया मुलीशी अन् जावयाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला वेळ नाही, अंत्यसंस्कार तुम्हीच उरकून घ्या, व्हिडिओ कॉल करून तो आम्हाला दाखवा. तिच्या अस्थी कुरियरने पाठवा असे सांगितले. याला काय म्हणणार. कुठे गेले ते लेकीचे आतडे. जिने नऊ महिने पोटात सांभाळून जन्माला घातले, तिच्याबद्दल असे बोलताना त्यांना काहीच कसे वाटले नसेल की व्यवहाराच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नसेल. कोल्हापुरातील वृद्धाश्रमातही अशा घटना कधी-कधी घडतात. जिवंतपणी पाहायलाही कुणी न येणारे नातेवाईक वृद्धाच्या निधनानंतर उगवतात. आपले कसे त्यांच्यावर प्रेम होते ते आक्रोश करून दाखविण्याचा प्रयत्न करतात. मृत वृद्ध पुरुष अथवा महिलेची काही ना काही मालमत्ता असते, त्यावर दावा सांगण्यासाठी त्यांचा हा आटापिटा असल्याचे त्यांच्या त्यानंतरच्या हालचालींवरुन जाणवते. कोल्हापुरातील सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी याबाबतचे दोन किस्सेही सांगितले. यावरून माणुसकी कमी होत चालली आहे का? संस्कार, नितिमत्ता शिकविण्यात आपण कमी पडत आहोत का, याचा विचार समाजानेच केला पाहिजे. सगळीच मुले अशी आहेत असे नाही. मातापित्यांची वर्षानुवर्षे सेवा सुश्रूषा करणारी मुलेही आहेत. सासू-सासºयांना आई-वडिलांसारखे जपणाºया सुनाही आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. या सर्वाला कारणीभूत आणखी एक घटक आहे तो म्हणजे पैसा आणि बदलती जीवनशैली. पैसा असेल तर मातापित्यांना वृध्दाश्रमात ठेवायला त्यांना तोशीस पडत नाही. ज्यांची आर्थिक कुवत नाही अशा घरांमध्ये भांडणे वाढतात. त्यातूनच जन्मदात्यांना घराबाहेर काढण्याच्या घटना घडतात. ज्यांना मोठे करून स्थिरस्थावर करण्यासाठी आयुष्याची पुंजी पणाला लावली, त्यांच्यावरच डोक्यावर हात मारून घेत आसºयासाठी नातेवाईकांची घरे शोधण्याची वेळ येते. तेथे लाचारीचे, आश्रिताचे जिणे त्यांच्या वाट्याला येते. हे सर्व बदलण्यासाठी कुणी पुढाकार घ्यायचा, हाच खरा प्रश्न आहे.
(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)