हद्दवाढप्रश्नी शासनाचा निषेध, सभात्याग
By admin | Published: March 30, 2015 11:58 PM2015-03-30T23:58:17+5:302015-03-31T00:18:11+5:30
महापालिका सभा : निशिकांत मेथेंनी फाईल भिरकावली
कोल्हापूर : शहराची हद्दवाढ नाकारून कोल्हापूरकरांवर राज्य शासनाने मोठा अन्याय केला आहे. ‘कोल्हापूर हे मोठे खेडेच राहावे, अशी मानसिकता बाळगणाऱ्या राज्य शासनाना तीव्र शब्दांत निषेध करत नगरसेवक निशिकांत मेथे यांनी सोमवारी महापालिकेच्या सभात्याग केला. मेथे यांनी फाईल भिरकावल्याने सभागृह काही काळ स्तब्ध झाले.महापालिकेची २०१५-१६ आर्थिक नियोजन आराखड्यास मंजुरी देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीस मेथे यांनी हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह व प्रशासन हद्दवाढीसाठी काहीच प्रयत्न करत नसल्याची खंत व्यक्त करून याप्रश्नी बोलण्याची मागणी मेथे यांनी केली. हातातील फाईल सभागृहात भिरकावून देत मेथे यांनी शासनाचा निषेध करून सभात्याग केला. त्यास विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी समर्थन दिले.तत्पूर्वी मेथे म्हणाले, राजकीय विरोधामुळे हद्दवाढ नाकारण्यात येत असल्याचे दोन ओळीचे कारण देत, राज्य शासनाने हद्दवाढीच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. याप्रश्नी महापालिका प्रशासन व नगरसेवकांनी आवाज उठविण्याची गरज आहे. राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत. शहराच्या विकासास ‘खो’ घालण्याचा प्रयत्न केला. हद्दवाढ ही शहरवासीयांची गेली ४० वर्षांची मागणी आहे. त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याने सभागृहाचा काही
कालावधीसाठी त्याग करत आहे. (प्रतिनिधी)