तुर्केवाडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार हेलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 02:05 PM2021-12-24T14:05:33+5:302021-12-24T14:06:23+5:30
तुर्केवाडी ता. चंदगड येथे ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव असा संयुक्त सोहळा शनिवार, २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे.
चंदगड : तुर्केवाडी ता. चंदगड येथे ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव असा संयुक्त सोहळा शनिवार, २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे. या सोहळ्यात सोमवार, २७ रोजी कलशारोहण कार्यक्रम असून त्यानिमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आपले हेलिकॉप्टर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
तुर्केवाडी येथे जिल्ह्यातील एक मोठा सोहळा होणार असून ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती, सोपानदेव पुण्यतिथी सोहळ्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची तयारी गेले कित्येक दिवस ग्रामस्थ करत आहेत. हा सोहळा द्विगुणित करण्यासाठी ब्रह्मलिंग मंदिरावर पुष्पवृष्टी व्हावी, यासाठी काँग्रेस नेते व गडहिंग्लज कषी उत्पन्न बाजार समितीचे नेते विक्रम चव्हाण पाटील, मंदिर उत्सव समिती व जीर्णोद्धार समिती सदस्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे साकडे घातले. त्याला पालकमंत्र्यांकडून होकार मिळाला असून सोमवारी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी होणार आहे.
सोमवार, २७ रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळेत हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार असल्याची माहिती उत्सव समिती व जीर्णोद्धार समितीने दिली आहे.