हॅलो ३ : घरफाळा, पाणी बिल पगारातूनच वसुलीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:05+5:302020-12-12T04:40:05+5:30
घरफाळा तसेच पाण्याची बिले भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर नागरिक गर्दी करतात. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतून बिले भरण्यात अडचणी ...
घरफाळा तसेच पाण्याची बिले भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर नागरिक गर्दी करतात. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतून बिले भरण्यात अडचणी येतात. त्यामुळे नोकरदारांनी संमती दिली तर त्यांच्या पगारातूनच ही बिले वसूल केली तर अधिक सोयीचे होईल. रांगेत उभे राहण्याचा त्रास व वेळ वाचणार आहे. तसेच थकबाकीची नामुष्कीही ओढवणार नाही. त्यामुळे नोकरदार मंडळींनी संमती दिल्यास त्यांच्या बँक खात्यातून ती रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा झाली. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असावी, महापालिका प्रशासनाने सक्ती अथवा जबरदस्ती करू नये, अशी सूचना पाटील यांनी केली. शहरात जवळपास एक लाख ४६ हजार मिळकती आहेत. त्यापैकी २५ ते ३० हजार मिळकतधारकांनी जरी संमती दिली तरी वसुली अधिक सोयीची तर होईल तसेच नागरिकांचा त्रास कमी होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
नोकरदार व्यक्ती ‘इसीएस’पद्धतीने विविध बँकांचे कर्जाचे हप्ते भरतात त्याच पद्धतीने घरफाळा व पाणी बिल भरण्याची सुविधा असणार आहे. या योजनेवर महापालिकेचे अधिकारी अभ्यास करत आहेत. त्याबाबत पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री पाटील यांनी सुचविले.