‘हेल्मेट’ ओझे नव्हे ‘जीवरक्षक’च
By Admin | Published: February 8, 2016 12:17 AM2016-02-08T00:17:36+5:302016-02-08T00:29:39+5:30
‘सर सलामत तो पगडी पचास’ : जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार दुचाकी धावतात
कोल्हापूर : दुचाकीस्वाराचा रस्ते अपघातात मृत्यू, असे सातत्याने वृत्तपत्रात आपण नेहमीच वाचत असतो. सातत्याने होणाऱ्या अपघातात युवापिढीच बळी पडत आहे. हाच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ सक्तीचे करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार आता कोल्हापुरातही येत्या काही दिवसांत ‘हेल्मेट’ वापरणे सक्तीचे होणार आहे. सक्तीपेक्षा जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने ‘हेल्मेट’ वापरणे काळाची गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथून ‘हेल्मेट’ सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने दिवसागणिक राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
अनेक अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन दुचाकीस्वारांना व त्या पाठीमागे बसलेल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणत हेल्मेट घ्यावे. हेल्मेट घेताना ते चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे असावे.
राज्य शासनाने तर नवीन दुचाकी घेतली की, त्या ग्राहकाला दोन हेल्मेट कंपनीनेच मोफत द्यावीत, असा आग्रह धरला आहे.
सक्ती नव्हे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन
पुण्यामध्ये १ फेबु्रवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही करण्यात आले.
औरंगाबादमध्ये तर जनतेनेच उत्स्फूर्तपणे हेल्मेट खरेदीला सुरुवात केली आहे. यासह मुंबईतही हेल्मेट सक्तीचा प्रयोग ९० टक्के यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. त्यामुळे याला सक्ती म्हणता येणार नाही.
विशेष म्हणजे, कायद्यातच अशी तरतूद आहे. त्यामुळे जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट नियमित वापरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्व दुचाकीस्वारांना केले आहे.