हेल्मेट कारवाईने वाहनधारकांची तारांबळ
By admin | Published: June 10, 2017 12:45 AM2017-06-10T00:45:54+5:302017-06-10T00:45:54+5:30
तीन दिवसांत ११८२ वाहनांवर कारवाई : ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल, कारवाई सत्र आठवडाभर सुरू राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सीटबेल्ट व हेल्मेट सक्तीमुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. कारवाईच्या भीतीने हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांचे पाय बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. कारवाई सत्र राबविल्याने गेल्या तीन दिवसांत सुमारे ११८२ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. शुक्रवारी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पूल ते वडणगे फाटा येथे वाहनचालकांवर कारवाई सुरू असताना वाहतुकीची कोंडी झाल्याने सुमारे अर्धा तास गोंधळ उडाला. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कोंडी दूर केली.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाती मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलातर्फे प्रबोधन केले जात आहे. महामार्गावर दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर हेल्मेट न वापरता वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील पुणे-बंगलोर महामार्गावर पेठवडगाव, शिरोली एमआयडीसी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, कागल पोलिसांनी कारवाई केली. यासह कोल्हापूर-रत्नागिरी, राधानगरी, गारगोटी, गगनबावडा, आदी मार्गांवरही पोलिसांनी नाकाबंदी करून सीटबेल्ट व हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. त्यामध्ये करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, गारगोटी, आदी पोलीस विशेष लक्ष देत आहेत. तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात सुमारे ११८२ वाहनचालकांवर कारवाई करून पोलिसांनी सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. हे कारवाई सत्र आठवडाभर सुरू राहणार आहे.
साहेब, उद्यापासून हेल्मेट घालतो !
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वडणगे फाटा येथे २५ ते ३० पोलिसांचा फौजफाटा शुक्रवारी रस्त्यावर उतरला होता. यावेळी सीटबेल्ट व हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू होती. एका वेळी पन्नास ते साठ वाहने रस्त्यावर थांबविल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ‘साहेब, आम्हाला काही माहिती नाही. उद्यापासून हेल्मेट घालून गाडी चालवेन,’ अशी विनवणी काही वाहनचालक करीत होते; परंतु पोलिसांनी दंडाची रक्कम भरूनच त्यांना सोडले.
गाडी नि हेल्मेट मागून आणलंय!
कोतोली परिसरातील दोघे दुचाकीस्वार कोल्हापूरला येत होते. दोघांकडेही हेल्मेट होते. त्यांच्याच एका मित्राला वडणगे फाटा येथे अडविले होते. त्याला पाहून ते थांबले. यावेळी त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट पाहून तो म्हणाला, ‘संभा, तुझी तर गाडी नाही. तू हेल्मेट कोठून घेतलंस?’ संभाने हसत ‘गाडी आणि हेल्मेट मागून घेतले आहे. सीपीआरमध्ये नातेवाइकाला बघायला चाललोय.’ असे सांगितले. या दोघांतील संभाषण ऐकून उपस्थित वाहनधारक त्यांच्या तोंडाकडे
पाहत बसले.