डॉक्टरांच्या मदतीने महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:44+5:302021-05-13T04:24:44+5:30

कोल्हापूर : बुधवार दुपारी एकची वेळ.. राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटलच्यासमोर रिक्षात महिला जोरात विव्हळत होती.. गलक्याने डॉक्टर बाहेर येऊन बघतात ...

With the help of a doctor, the woman gave birth in a rickshaw | डॉक्टरांच्या मदतीने महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

डॉक्टरांच्या मदतीने महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

Next

कोल्हापूर : बुधवार दुपारी एकची वेळ.. राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटलच्यासमोर रिक्षात महिला जोरात विव्हळत होती.. गलक्याने डॉक्टर बाहेर येऊन बघतात तर गर्भवती महिलेच्या पोटातून बाळ अर्धवट बाहेर आलेले आणि महिलाही अवघडलेल्या स्थितीत.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर निरंजन शहा यांनी महिलेची रिक्षातच प्रसूती केली.. गोंडस मुलाचा जन्म झाला. बाळ-बाळंतीण दोघेही सुरक्षित असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना काळात रुग्णालयांचा वाईट अनुभव येत असताना रिक्षाचालक आणि डॉक्टरांमधील देवमाणसाची प्रचिती दिली.

महालक्ष्मी नगरातील दीपा प्रवीण तुडवेकर या महिलेला दुपारी प्रसूती कळा सुरू झाल्या. परिसरातीलच रिक्षाचालक अस्लम कित्तुरे यांनी त्यांना तातडीने लोटस हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. तोपर्यंत बाळाचं डोकं अर्धवट बाहेर आले होते आणि महिला अवघड स्थितीत झोपली होती. तिच्या सोबतची महिला डॉक्टरांना बोलवा असे म्हणत होती. या गलक्याने डॉ. निरंजन शहा हॉस्पिटलबाहेर आले. समोरील दृष्य पाहून काही क्षण तेदेखील स्तब्ध झाले. अशा स्थितीत महिलेला हलविणे म्हणजे बाळ व बाळंतीण दोघांच्याही जिवाला धोका होता. महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे माहीत नव्हते; पण ही वेळ याचा विचार करण्याची नव्हती. त्यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न लावता आडोसा तयार करून अत्यंत कौशल्याने रिक्षामध्येच महिलेची प्रसूती केली. त्यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ किमया शहा होत्या. बाळ - बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. किमया शहा यांनी बाळाच्या श्वासोच्छवासाची तयारी करून रुग्णालयात नेले. लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ यांनी कोरोना आपत्तीच्या या काळात भीती न बाळगता जोखीम पत्करून त्या महिलेची सुटका केली. त्यांच्यासह रिक्षाचालक अस्लम कित्तुरे यांच्या सतर्कतेमुळे बाळंतीण महिलेला व तिच्या बाळाला जीवदान मिळाले. लोटस हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात प्रसूती होत असल्याने गरीब व गरजू माता तिथे बाळंतपणास प्राधान्य देतात.

--

महिलेला त्या स्थितीत उचलून रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. बाळाला बाहेर आल्यावर तीन मिनिटांच्या आता श्वासोच्छवास करता नाही आला तर गंभीर वेळ येऊ शकते. महिलेलाही मोठी शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. त्याक्षणी बाळ आणि महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते. आम्ही ते करू शकलो याचे मोठे समाधान आहे.

डॉ. निरंजन शहा

--

फोटो नं १२०५२०२१-कोल-महिला डिलिव्हरी

ओळ : कोल्हापुरातील राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटलच्या दारातच बुधवारी रिक्षामध्ये महिलेची प्रसूती झाली असून, डॉक्टरांचे प्रयत्न आणि रिक्षाचालक अस्लम कित्तुरे यांच्या सतर्कतेमुळे बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत.

--

Web Title: With the help of a doctor, the woman gave birth in a rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.