सामाजिक बांधीलकीतून राजमाता जिजाऊ हॉस्पिटलसाठी मदत करा
By admin | Published: June 5, 2017 12:46 AM2017-06-05T00:46:39+5:302017-06-05T00:46:39+5:30
सामाजिक बांधीलकीतून राजमाताजिजाऊ हॉस्पिटलसाठी मदत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सुरू होणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ को-आॅप. हॉस्पिटल’ला सामाजिक बांधीलकीतून मदत करा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. उद्योजकांबरोबरच मोठ्या सहकारी संस्थांकडून भाग भांडवल घेऊन गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा द्या, असेही त्यांनी सागिंतले.
सहकार विभागाच्या वतीने कावळा नाका येथे ‘राजमाता जिजाऊ को-आॅप. हॉस्पिटल’ सुरू होत आहे. त्याची आढावा बैठक मंत्री देशमुख यांनी रविवारी घेतली. सामान्य माणसाकडून एक हजाराचा शेअर्स घेऊन त्यांना उपचारांत कितीशी सवलत देणार? वैद्यकीय क्षेत्राशी स्पर्धा करीत चांगली सेवा द्यायची म्हटले तर सवलतीवर मर्यादा येणार आहे. त्यासाठी मोठ्या संस्था व उद्योजकांनी भाग भांडवल द्यावे. कोल्हापूरकरांनी मनात आणले तर काहीच अशक्य नाही. आपल्या व्यवसायातील अगदी अत्यल्प निधी हॉस्पिटलसाठी दिला तर चांगले हॉस्पिटल उभे राहील, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.
संकल्पना चांगली आहे; पण हे हॉस्पिटल नियमित हॉस्पिटलप्रमाणे सुरू केले तर त्याचा फायदा सामान्यांना होणार नाही. त्यापेक्षा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहिले तर अधिक चांगले असल्याचे डॉ. अशोक चौगुले यांनी सांगितले. हॉस्पिटलचे प्रवर्तक डॉ. अभिजित सूर्यवंशी, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंंगळे, अनिल नागराळे, सुरेंद्र जैन, अविनाश महागांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी हॉस्पिटलची संकल्पना सांगितली. सुनील सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी ‘म्हाडा’, पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. संजय मंडलिक, बाबा देसाई, संदीप देसाई, नूपुर खाडे, नामदेवराव भोईटे, पंडितराव केणे, संजय जोशी, आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते.
‘त्या’ संस्था
मोडकळीस आल्या!
केवळ सरकारी मदतीवर उभ्या राहिलेल्या संस्था लवकर मोडकळीस येतात, हा अनुभव आहे. त्यासाठी सरकारी पैशांबरोबर जनता असेल तर त्याला यश येते, असे देशमुख यांनी सांगितले.
सुरेश पाटील
यांच्याकडून एक लाख
उद्योजक सुरेश पाटील यांनी हॉस्पिटल उभारणीसाठी एक लाख रुपये मदत जाहीर केली. त्याचबरोबर ‘बिद्री’ साखर कारखान्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ४ लाख ९८ हजारांचे भाग भांडवल जमा केले.
परदेशात पैसे ठेवायला पैसे मोजावे लागतात
परदेशात उद्योजकांना चार टक्के दराने कर्जे दिली जातात. त्याच धर्तीवर आपल्याकडे द्यावीत, अशी मागणी सुरेंद्र जैन यांनी केली. यावर परदेशात कमी व्याजाने कर्जे दिली जातात, हे जरी खरे असले तरी तिथे पैसा इतका आहे, की पैसे ठेवण्यासाठीही पैसे मोजावे लागतात, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.