Maharashtra Vidhan Sabha 2019 : विनय कोरेंचा थेट घरी जाऊन अरुण नरके यांना प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:02 PM2019-09-28T14:02:55+5:302019-09-28T14:10:10+5:30
जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना ताकद देतो, असा प्रस्ताव त्यांनी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
कोल्हापूर : जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना ताकद देतो, असा प्रस्ताव त्यांनी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
पन्हाळा तालुक्याच्या राजकारणात दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व विनय कोरे यांचा कायमच संघर्ष राहिला. २५ वर्षे यशवंत पाटील यांनी ‘पन्हाळा-गगनबावडा’ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. पाटील व अरुण नरके हे मामाभाचे असल्याने दोघांनीही एकमेकांसोबतच राजकारण केले.
विधानसभाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत व जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत कोरे-पाटील गट आमनेसामने आजही येतात. अनेक वेळा दोन्ही गटांत मोठा संघर्ष उफाळून आला; त्यामुळेच पन्हाळ्यातील प्रत्येक गावात दोन्ही गट ताकदीने उभे आहेत.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक अमरसिंह पाटील हे ‘स्वाभिमानी’तून रिंगणात होते. पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे रिंगणात उतरल्याने पन्हाळ्यातील मतांमध्ये विभाजन होऊन कोरे यांचा अवघ्या ३00 मतांनी पराभव झाल्याचे ‘जनसुराज्य’च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे; त्यामुळेच यावेळेला पन्हाळ्यातील पडझड रोखत विरोधकांना सोबत घेण्याची तयारी कोरे यांनी केली आहे.
अमरसिंह पाटील यांच्याशी जुळवून घेतल्यानंतर आता नरके गटाला सोबत घेऊन सत्यजित पाटील यांचा वारू रोखण्याची खेळी ते खेळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता अरुण नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी अचानक भेट दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. ‘शाहूवाडीत’ आम्हाला मदत करा, चंद्रदीप नरके यांना करवीरमध्ये मदत करण्याचा प्रस्ताव कोरे यांनी नरके यांच्यासमोर ठेवला.
कोरे पहिल्यांदाच नरके यांच्या घरी
पन्हाळा तालुक्यात कोरे-नरके यांचा राजकीय सत्तासंघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे; त्यामुळे २५-३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विनय कोरे हे थेट नरके यांच्या घरी पहिल्यांदाच गेल्याने पन्हाळा-शाहूवाडीत एकच खळबळ उडाली आहे.
‘हातकणंगले’त आवळेंसह दोन डॉक्टर इच्छुक
हातकणंगले मतदारसंघातून ‘जनसुराज्य’ पक्षाकडून माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह डॉ. विश्वनाथ सावर्डेकर व डॉ. मिलिंद हिरवे हे इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने हे येथून प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे; पण त्यांनी अद्याप संपर्क साधला नसल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
विनय कोरे माझ्याकडे आले होते. निवडणुका असल्याने सर्वजण भेटत असतात, त्याचप्रमाणे ते भेटले. त्या पलिकडे काहीच चर्चा झाली नाही.
- अरुण नरके,
ज्येष्ठ संचालक, ‘गोकुळ’