मदतनीस चालवतेय पेरणोली उपआरोग्य केंद्र
By admin | Published: March 25, 2015 09:10 PM2015-03-25T21:10:23+5:302015-03-26T00:28:05+5:30
चार वर्षे डॉक्टर नाही : डॉक्टर नसल्याने रुग्णालयासह रुग्णांची हेळसांड
कृष्णा सावंत - पेरणोली (ता. आजरा) येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्रात तब्बल चार वर्षे आयुर्वेदिक डॉक्टर नसल्याने नाईलाजास्तव केंद्राच्या मदतनिसालाच कारभार चालवावा लागत आहे.
पेरणोली हे आजरा तालुक्यातील मोठे गाव असल्याने येथे शासकीय डॉक्टरांची नितांत गरज आहे. तब्बल चार वर्षे उपआरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्णालयासह रुग्णांचीही हेळसांड होत आहे. एकट्या शांता पताडे या मदतनीस म्हणून काम करण्याऱ्या महिलेलाच उपआरोग्य केंद्राचा कारभार हाकावा लागत आहे. या सगळ्या प्रकाराकडे गावकऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
पताडे या २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उपआरोग्य केंद्रात काम करीत आहेत. अनेक डॉक्टरांच्या हाताखाली काम केल्याने
साधारण सर्दी, खोकला या आजारांवरील औषधांचा त्यांना अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावरच त्या एकहाती केंद्र चालवित आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आठवड्यातून एक दिवस डॉक्टरांची नेमणूक केली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते; परंतु ते कधी येतात, याची कुणालाही कल्पना नाही.
पेरणोलीकरांनी लोकवर्गणीतून केंद्राचे सुशोभीकरण केले आहे. आरोग्यसेविका सुवर्णा सावरतकर, आशा स्वयंसेविका मंदाकिनी कोडक, रेखा दोरुगडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकवर्गणीतून रंगरंगोटी, समोरील गेट दुरुस्ती, आदी कामे करण्यात आली आहेत. वैद्यकीय तपासणी वगळता गरोदर मातांचे आरोग्य, प्रसूती स्त्रियांना मार्गदर्शन, आदी कामकाज उत्कृष्टपणे चालू आहे. याबाबत गावकरी समाधानी आहेत.
मात्र, येथील वैद्यकीय विभाग बंद असल्याने पेरणोलीसह हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडी, धनगरवाडा, चव्हाणवाडी या वाड्यावस्त्यांवरील रुग्णांची
कुचंबणा होत आहे. डॉक्टर नसल्याने अनेक गरीब, गरजू रुग्णांना
खासगी रुग्णालयांचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
तब्बल चार वर्षे डॉक्टर नसताना परिसरातील एकाही लोकप्रतिनिधीने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टरांसाठीही आग्रह धरलेला नाही. लोकप्रतिनिधींना केवळ रस्ता आणि गटारीमध्येच इंटरेस्ट आहे का? असा सवाल करून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.