उद्ध्वस्त ऊस उत्पादकांना मदतीची आस
By admin | Published: June 3, 2016 01:33 AM2016-06-03T01:33:01+5:302016-06-03T01:35:34+5:30
सरकारचे दुर्लक्ष : २५ लाख टनांनी उत्पादन घटणार; शेतकऱ्यांचा आक्रोश; पंचनामे करण्याची मागणी
कोल्हापूर : पाच-सहा महिने पोटच्या पोरासारखा सांभाळ करून वाढविलेला ऊस डोळ्यांदेखत पाण्याविना करपू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या करपलेल्या उसाचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या भयावह स्थितीमुळे शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. किमान २५ लाख टन उसाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकरी ऊस पेटवून देत आक्रोश करीत असताना सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे सधन जिल्हा म्हणून पाहिले जात होते; पण यंदा या सधन जिल्ह्यालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पंचगंगा व भोगावती खोऱ्यांत गेले पंधरा-वीस दिवस उपसाबंदी लागू आहे. पिकांना थेंबही पाणी नाही. त्यात उन्हाच्या कडाक्यामुळे ऊस करपून गेला. जिवापाड जोपासलेल्या उसाची अवस्था पाहून त्याकडे बघण्याचे धाडसही शेतकऱ्यांना होईना. वाळलेला ऊस शेतकरी कापून टाकत आहेत, तर काही शेतकरी तो थेट पेटवून देऊन आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस करपल्याने या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांना आगामी हंगामात त्याचा फटका बसणार, हे नक्की आहे. ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘शाहू’, ‘मंडलिक’, ‘बिद्री’, ‘घोरपडे’ या कारखान्यांचे गळीत कमी होणार आहे. जिल्ह्यात आगामी हंगामात किमान २५ लाख टन ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. २५ लाख टन ऊस करपल्याने शेतकऱ्यांना सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसणार आहे. बियाणे, मशागत, पाणी व खतांसाठी हजारो रुपये खर्च झालेले आहेत. यासाठी बॅँकांकडून कर्जे घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. करपलेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)