‘एक हात मदतीचा - शाळेसाठी’ गगनबावडा येथे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:32+5:302021-03-28T04:23:32+5:30
साळवण : परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी, सराव व कसरती करण्याकरिता खूप वर्षांपासून ...
साळवण : परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, गगनबावडा येथील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी, सराव व कसरती करण्याकरिता खूप वर्षांपासून मैदानाची कमतरता भासत आहे. या सामाजिक जणिवेतून येथील काही युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या भावनेतून प्रेरित होऊन ‘एक हात मदतीचा-आपल्या शाळेसाठी’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. परशुराम विद्यामंदिर शाळेच्या सभोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा योग्य वापर करण्याच्यादृष्टीने आजी-माजी विद्यार्थी, मित्र परिवार, संस्था, संघटना व वैयक्तिक निधी जमा करून मैदानाचे सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या नियोजित कामाकरिता गगनबावडा तालुका कलामंच, ए. बी. पाटील सर फौंडेशन, रवींद्र नर (माजी विद्यार्थी), आजी- माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्याकडून आतापर्यंत ५० हजार रुपये जमा झाले आहेत.
मैदान तयार करण्यासाठी मित्र परिवाराने सढळ हाताने सहकार्य करण्याचे आवाहन विनोद प्रभूलकर यांनी केले आहे.
या नावीन्यपूर्ण उपक्रमाकरिता गिरीश प्रभूलकर, रवींद्र सराफदार, रवी नर, संतोष पाटील, ए. बी. पाटील, जावेद अत्तार, हर्षद सूर्यवंशी, अमर भांबुरे, राजू कोळेकर, डॉ. सागर विभूते आणि शिक्षक स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले.