‘अमृत’च्या कुटुंबासाठी सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:32+5:302021-07-17T04:20:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्याला असलेल्या म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील अमृत धोंडिबा दळवी या युवकाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्याला असलेल्या म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील अमृत धोंडिबा दळवी या युवकाचे २७ एप्रिल २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. अमृतच्या जाण्याने त्याचे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुलगे यांच्यावर आभाळच कोसळले. कर्त्या मुलाच्या आकस्मिक निधनाने उघड्यावर पडलेल्या दळवी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी ग्रामस्थ, मित्रमंडळी व अमृतच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेतला. ‘आम्ही म्हाळेवाडीकर’ नावाने सुरू असलेल्या व्हाॅट्सअॅप ग्रुपद्वारे मयत अमृतच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला ग्रामस्थ व मित्रमंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. अमृतच्या मित्रांनी ५१ हजार रुपये जमा केले. ग्रामस्थ व मित्रमंडळी, दानशूर व्यक्तींनी २ लाख रूपये मदत करून बेताची परिस्थिती असलेल्या अमृतच्या कुटुंबीयांना मदतीचा मोलाचा हातभार लावला. म्हाळेवाडी येथे एका कार्यक्रमात हा जमा झालेला निधी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते मयत अमृतचे वडील व लहान मुलांकडे सुपूर्द करण्यात आला. दोन लाख ११ हजार रुपयांच्या मुलांच्या नावे ठेव पावत्या व उदरनिर्वाहासाठी या कुटुंबाला रोख ४० हजार रूपये देण्यात आले.
फोटो ओळी : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे मयत अमृत दळवी यांच्या कुटुंबीयांना आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रमांक : १६०७२०२१-गड-०३