रस्त्यावरील वारांगनांसाठी धावले मदतीचे हात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:49+5:302021-05-16T04:22:49+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न पडलेल्या वारांगनांना कोल्हापुरातील महिलांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शुभांगी थोरात व डॉ. प्रिया ...
कोल्हापूर : कोरोनामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न पडलेल्या वारांगनांना कोल्हापुरातील महिलांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शुभांगी थोरात व डॉ. प्रिया दंडगे यांनी पुढाकार घेऊन मदत जमा केली व शनिवारी हलाखीच्या परिस्थितीचा सामना करीत असलेल्या २४ हून अधिक वारांगनांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोनाने माणसांना घरात बंदिस्त केले असले तरी पोटाची भूक शांत बसू देत नाही. कामधंदा, नोकरीवर असलेल्यांनाही जिथे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तिथे वारांगनांच्या कुटुंबाची काय स्थिती असेल याचा विचारही न केलेला बरा. अशा वंचित महिलांना काही मदत करूया या उद्देशाने शुभांगी थोरात व प्रिया दंडगे यांनी समाज माध्यमावर मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे, सातारा, आटपाडी यासह जिल्ह्यातील परिचयातील नागरिकांनी शक्य तितकी मदत दिली. त्यात स्वत:कडील काही रक्कम घालून शनिवारी दसरा चौकात ही मदत अन्नधान्य स्वरूपात देण्यात आली. संतोष कासवतकर यांनी साहित्य वाटप करण्यासाठी मोफत वाहन उपलब्ध करून दिले.
काय दिले..
महिनाभर पुरेल इतके गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा, तेल, बेसन, डाळी.
--
फोटो नं१५०५२०२१-कोल-वारांगना
ओळ : कोल्हापुरातील दसरा चौकात शुभांगी थोरात व डॉ. प्रिया दंडगे यांच्या पुढाकाराने वारांगनांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
--